राजापूर बाजारपेठेत शॉर्टसर्किटने आग, अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:11+5:302021-06-25T04:23:11+5:30
राजापूर : शहर बाजारपेठेतील विद्युत खांबावर अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना बुधवारी (दि. २३) रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान ...
राजापूर : शहर बाजारपेठेतील विद्युत खांबावर अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना बुधवारी (दि. २३) रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. मात्र नागरिक, महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकारामुळे काही काळ शहर बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
बाजारपेठेतील याहू व आरेकर यांच्या सर्व्हिस वायरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची माहिती महावितरणचे शाखा अभियंता चिन्मय चिवटे यांनी दिली. बुधवारी रात्री पाऊस पडत असतानाच अचानक बाजारपेठेत पन्हळेकर मेडिकलजवळील खांबावर शॉर्टसर्किट होऊन आग लागली. हे लक्षात येताच तत्काळ नागरिकांनी महावितरण कार्यालयाला माहिती दिली.
महावितरणकडून लगेचच वीजपुरवठा बंद करण्यात आला. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता या ठिकाणी याहू व आरेकर यांच्या वीज मीटरच्या सर्व्हिस वायरने पेट घेतला असल्याचे लक्षात आले. सर्व्हिस वायरमधील दोषामुळे ही आग लागल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. यानंतर तेवढ्याच भागातील वीज बंद करून उर्वरित भागातील पुरवठा महावितरणकडून सुरू करण्यात आला.