कोरोनामुळे वाद्य खरेदीला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:43+5:302021-09-08T04:38:43+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत आरती, भजनांचा साज काहीसा वेगळाच असतो. प्रत्येक भक्तगणांच्या अंगात जणू उत्साह संचारलेला असतो. त्यामुळे दररोजची ...
रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत आरती, भजनांचा साज काहीसा वेगळाच असतो. प्रत्येक भक्तगणांच्या अंगात जणू उत्साह संचारलेला असतो. त्यामुळे दररोजची आरती बराचवेळ चालते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे ढोलकी व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
घरोघरी टाळ, मृदंग भजनासाठी लागणारी वाद्य आढळतात. भजनीबुवांकडे तबला, पखवाज किंवा पेटी असतेच. उत्सव कालावधीत भजनांची डबलबारी तर चांगलीच रंगते; परंतु गतवर्षीपासून कोरोनामुळे बहुतांश मंडळींची आर्थिक घडी विस्कटली आहे. वर्षाचा सण केवळ साजरा करायचा, एवढीच भावना आहे. त्यामुळे सध्या नवीन खरेदी काहीच नाही, वाद्यांची डागडुजी मात्र सुरू आहे. कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना शासनातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे भजनाची डबलबारी किंवा जाखडीसारख्या कार्यक्रमांवरही निर्बंध आले आहेत. ढोलकी कारागिरांनाही फारसे काम राहिलेले नाही. पखवाज, ढोलकी, तबला, डग्गा, शाई पुडा, शाई पान यांना अत्यल्प मागणी आहे. काही मंडळी तर जुन्या साहित्यांनाच साज देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवापूर्वीच तीन-चार दिवस आधी शहारातील गल्लोगल्लीत, तसेच ग्रामीण भागात ढोलकी, ताशे विक्रेते फिरत असल्याने संपूर्ण गल्ली दुमदुमत असते. छोट्या ढोलकी, ताशांची सर्रास विक्री केली जाते. मात्र, गेली दोन वर्षे परराज्यांतील विक्रेतेही येत नाहीत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्णत: शांतता आहे. मुलांनाही कोरोनाच्या भीतीमुळे घराबाहेर पाठवण्यास पालक तयार नसल्याने गणेशोत्सवातील नेहमीसारखा उत्साह राहिलेला नाही.
वाद्याच्या दुकानांमध्ये ढोलकी, नाल, पखवाज, टाळ व चकवा, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे ढोल, बेंजोचे साहित्य, ढोल पथकांसाठी लागणारे ढोल आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जाखडी, भजनांची डबलबारी, तसेच मिरवणुकांना बंदी असल्याने वाद्यसाहित्य खरेदीवर परिणाम झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.