कमी काळातील अतिवृष्टी, समुद्राच्या भरतीमुळे पूर; जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांनी केले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 12:03 PM2021-12-22T12:03:00+5:302021-12-22T12:03:37+5:30
चिपळूण : सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी व त्याचवेळी आलेली भरती हेच महापुराचे ...
चिपळूण : सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी व त्याचवेळी आलेली भरती हेच महापुराचे प्रमुख कारण आहे. पहिल्या दिवशी ७७६ मिलिमीटर, तर दुसऱ्या दिवशी ६१० मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्याने चिपळुणात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. महापुरात कोळकेवाडी धरणाचे पाणी केवळ २ टक्केच होते. त्याने फारसा फरक पडलेला नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गाेगरे यांनी दिली.
वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव विजय गोगरे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मुख्य अभियंता गोगरे यांनी मंगळवारी चिपळुणात वाशिष्ठी व शिवनदीची पाहणी केली. त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात चिपळूण बचाव समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
समितीचे अरुण भोजने, बापू काणे, शहानवाज शाह, किशोर रेडीज, सतीश कदम, शिरीष काटकर, उदय ओतारी आदींनी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळाची परिस्थिती कथन केली. प्रत्यक्षात गाळ काढण्यासाठी यंत्रणा दाखल होत नाही व प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच सांगली, कोल्हापूरला वाचविण्यासाठी चिपळूणला बुडवल्याचा आरोपही समिती सदस्यांनी केला. गेल्या ५० वर्षांत नदीतील गाळ काढला नाही. तो न काढताच पूररेषा मारली गेल्याचे सांगितले.
जलसपंदाचे मुख्य अभियंता विजय गोगरे यांनी सांगितले की, वाशिष्ठी नदीची किमान ३ लाख क्युसेक्स पाण्याची वहन क्षमता असणे आवश्यक आहे. नद्यातील बेटे आणि गाळ काढल्यानंतर वहन क्षमता पाहिली जाईल. गाळ काढण्याच्या कामकाजात सुसूत्रता राहावी यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी व अन्य अधिकारी उपस्थित होते. आता गाळ उपसा कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.