चिपळुणात कोविड लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:32 AM2021-04-08T04:32:08+5:302021-04-08T04:32:08+5:30
चिपळूण : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढत असल्याने आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंध लसीकरणावर भर दिला होता. परंतु आता ...
चिपळूण : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढत असल्याने आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंध लसीकरणावर भर दिला होता. परंतु आता लसीचा तुुटवडा निर्माण झाला असून बुधवारी ४ वाजल्यापासून तालुक्यात लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसीची उपलब्धता झाल्यानंतरच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली आहे. तालुक्यातील प्रत्येक केंद्रासाठी दररोज किमान १०० लसींची मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट आता रौद्ररूप धारण करू लागली आहे. मुंबई, पुणेनंतर आता कोकणातही कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढू लागली आहे. चिपळूण तालुक्यात गेल्या महिनाभरात जवळपास २९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी एका दिवसात तब्बल ४२ नवे रुग्ण चिपळूणमध्ये सापडल्याने चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर आरोग्य सुविधा अपुरी पडण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला होता.
सर्वाधिक गर्दीची ठिकाणे तसेच दाटीवाटीची वस्ती चिपळूण शहरात असल्याने येथे रुग्णसंख्या वेगाने वाढण्याची शक्यता गृहीत धरता आरोग्य विभागाने शहरात लसीकरण वेगात सुरू केले होते.
प्रत्यक्षात चिपळूण शहराला दररोज १५० कोविड लस दिले जात होते. मात्र येथील संभाव्य धोका ओळखून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी शहरासाठी किमान २५० लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे लसीची मागणी केली होती. त्यानुसार लसीचे डोस उपलब्ध करण्यात येत असून, शहरात आता दररोज २०० जणांना लस दिली जात होती. अशातच लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत.
दररोज एक हजार लसींची मागणी
बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून ही केंद्रे बंद करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांनी दिली. तालुक्यात दररोज ११०० ते १२०० लोकाचे लसीकरण केले जात होते. वाढणारी रुग्णसंख्या पाहता तालुक्यातील प्रत्येक केंद्राला दररोज किमान एक हजार लस उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे लस उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ लसीकरण सुरू केले जाईल आणि उपलब्धतेनुसार लसीकरणाचा वेगदेखील वाढवण्यात येणार असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.
कामथेतील लसीकरण बंद
कामथे उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत लसीकरण केले जात होते. मात्र आता या रुग्णालयात कोरोनाबाधित ५४ रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला. तसेच येथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. शहरातील नागरी आरोग्य केंद्र व सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचा विचार करता कामथे येथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे केंद्र बंद करून नागरी आरोग्य केंद्रात २५० पर्यंत लसीचे प्रमाण वाढविले जाणार आहे.
..................
लसीचा तुटवडा जाणवण्याचे कारण स्पष्ट करताना ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे आणि प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अशा ठिकाणी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे धोरण असावे. त्यासाठी त्या त्या भागात अधिक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडील लस पुरवठा कमी करण्यात आला असावा अशी शक्यता आहे.
डॉ. ज्योती यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिपळूण