खंडणीसाठी झाडली रत्नागिरीतील व्यावसायिकावर गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:56 PM2020-02-22T14:56:00+5:302020-02-22T14:57:08+5:30
रत्नागिरी शहरातील नॅशनल मोबाईल दुकानाचे मालक मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर त्याच्या घराखालीच कारमधून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पोटाला गोळी लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नॅशनल मोबाईल दुकानाचे मालक मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर त्याच्या घराखालीच कारमधून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पोटाला गोळी लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.
रात्री सहा तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात आली. खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला नामचित गुंड सचिन जुमनाळकर याने खंडणीसाठी ही गोळी झाडल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच शहरभर नाकाबंदी केली होती.
मनोहर ढेकणे हे नेहमी प्रमाणे आठवडा बाजार येथील आपले दुकान बंद करुन ९.३० वाजण्याच्या सुमारास दुकानातून बाहेर पडले. ते बंदर रोड येथील फडके उद्याननजिक इमारतीमध्ये राहतात. इमारतीखाली पाक्रिंगमध्ये ते मोबाईलवर बोलत असताना चारचाकी कार येऊन त्यांच्यासमोर थांबली. त्यातून एक तरुण खाली उतरला. त्याने त्यांच्यावर थेट गोळीबार केला.
या हल्ल्यात ढेकणे यांच्या पोटात गोळी लागली. ते जखमी अवस्थेत खाली कोसळले. गोळीबाराच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी तेथे धाव घेतली. त्यांचा मुलगा राहुल तेथे आला. तर गोळीबार करून पळून गेलेल्या लोकांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
प्राथमिक चौकशीत सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर याचे नाव पुढे आले आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पेरोलवर सुटल्याचे पोलिसांनी सांगितले. कारागृहात असल्याने सचिनकडे पैसे नसल्यामुळे त्याने खंडणीतून हा गोळीबार केल्याचा अंदाज आहे.
सहा तास शस्त्रक्रिया
मनोहर ढेकणे यांच्या पोटातील गोळी काढण्यासाठी जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल सहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. सहा तासानंतर त्यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, या शस्त्रक्रियेसाठी चार सर्जन, दोन भूलज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
रत्नागिरीत आला केव्हा?
सचिन जुमनाळकर रत्नागिरीत केव्हा आला ? तो कोणाच्या संपर्कात होता ? त्याच्या सोबत गाडीत अन्य कोण होते? गाडी नेमकी कोणाची होती याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.