नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:18+5:302021-09-07T04:38:18+5:30

खेड : नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५च्या कलम ५५(१) ...

Show cause notice to Mayor Vaibhav Khedekar | नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना कारणे दाखवा नोटीस

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना कारणे दाखवा नोटीस

Next

खेड : नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५च्या कलम ५५(१) व ५५ अव ब अन्वये गैरवर्तन, अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य नगरविकास विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदावरून बडतर्फ का करण्यात येऊ नये याविषयी लेखी खुलासा पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नगरपरिषदेचे शिवसेना गटनेता प्रज्योत तोडकरी, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेवक प्रशांत कदम, सुरभी धामणस्कर, रुपाली खेडेकर, अल्पिका पाटणे, मनीषा निर्मल, नम्रता वडके व सीमा वंडकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याप्रमाणे चौकशी समितीतर्फे चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर केला आहे. नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना व लोकसेवक म्हणून कार्य करीत असताना काही प्रकरणी गैरवर्तन, अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याचे आढळले आहे. खेड नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत केलेल्या विकासकामांच्या अंतिम बिलावर विहीत पध्दतीने कार्यवाही न करता, काही अंतिम देयकांवर मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरी नसताना एकट्याने स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

तसेच १५ टक्के सहायक अनुदानअंतर्गत विकासकामांच्या करारनाम्यावर नगरसेविका मानसी चव्हाण ह्या स्थायी समिती सदस्य नसताना, त्यांच्यासह स्वाक्षरी करून पदाचा गैरवापर, १५ टक्के सहायक अनुदानअंतर्गत विकासकामांच्या करारनाम्यावर दोन सदस्यांच्या स्वाक्षरी आवश्यक असताना एकट्याने स्वाक्षरी केली आहे. तसेच अंतिम बिलावर विहित पध्दतीने कार्यवाही न करता काही अंतिम देयकावर मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरी नसताना एकट्याने स्वाक्षरी केल्याचे म्हटले आहे. खासगी वाहन अनुज्ञेय नसताना नगरपरिषदेच्या खर्चाने मर्यादेपेक्षा अधिक इंधन भरून अनियमितता केली आहे. सर्वसाधारण सभेतील ठरावात स्वत:च्या अधिकारात बदल करून अनियमितता, बांधकाम परवानगीतील अटींची पूर्तता न केल्याबाबत, नगरपरिषदेतील कंत्राटी वाहनचालकाच्या सेवा स्वत:च्या वाहनासाठी उपलब्ध करून घेणे आदी मुद्द्यांवर या चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

नगरनियोजन विभागाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या अहवालाच्या आधारे ही नोटीस बजावली आहे. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून दूर करून, पुढील ६ वर्षांच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अनर्ह का करण्यात येऊ नये यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Show cause notice to Mayor Vaibhav Khedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.