आमदार साळवी यांची हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:52+5:302021-07-22T04:20:52+5:30

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या ...

Show courage to expel MLA Salvi | आमदार साळवी यांची हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवा

आमदार साळवी यांची हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवा

Next

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या मंडळींना पक्षात घेऊन भाजप आपली पाठ थोपटून घेत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या सागवे विभागातील पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काबाडकष्ट करून तळागाळात पक्षसंघटना वाढविणाऱ्यांनी रिफायनरीचे समर्थन केले म्हणून हकालपट्टी केली; मग रिफायनरी प्रकल्पाचे जाहीर समर्थन करणाऱ्या शिवसेना आमदार राजन साळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. हिंमत असेल तर शिवसेनेने आमदार साळवी यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही गुरव यांनी दिले आहे.

सागवेच नाही तर तालुक्याच्या अनेक भागांतील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक शिवसेनेच्या विकासविरोधी राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. त्यामुळेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पायांखालची जमीन आता सरकू लागल्याचा टोला गुरव यांनी लगावला आहे. राजापूर तालुक्यात भाजपने शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. सागवे विभागातील रिफायनरी प्रकल्पसमर्थक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला असतानाच शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करीत शिवसेनेला दणका दिला.

जे भाजपमध्ये गेले त्यांची दोन वर्षांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यांना पक्षात घेऊन ढोल बडविणे म्हणजे भाजपचा वैचारिक दळभद्रीपणा असल्याची टीका सागवेतील शिवसेना पदाधिकाऱ्याने केली आहे. याचा समाचार गुरव यांनी घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती, तर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून, त्यांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा घेऊन फेरनिवडणूक घेण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न गुरव यांनी केला आहे. ज्यांनी निष्ठेने पक्षात काम केले, पदरमोड करून पक्ष वाढविला, तळागाळात संघटना वाढविली, त्यांनी विकासासाठी प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून त्यांची हकालपट्टी करता आणि मग मुंबईत टीव्ही चॅनेलसमोर रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत करून जाहीर समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवींची का नाही हकालपट्टी केली? असा प्रश्नही गुरव यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय असे शिवसेनेने आहे काय? असाही टोला गुरव यांनी लगावला आहे. भविष्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही गुरव यांनी केला आहे.

Web Title: Show courage to expel MLA Salvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.