लोकसहभागाच्या चळवळीतून श्रमदान, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:18 PM2019-05-07T15:18:30+5:302019-05-07T15:22:48+5:30
दापोली शहराच्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ शेकडो हातांनी लोकसहभागातून श्रमदान केले. या श्रमदान मोहिमेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभागी होत या दापोली पॅटर्नचे कौतुक केले. दापोली नगरपंचायतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून राबविलेल्या श्रमदान मोहिमेत सहभागी झालेले सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांचे आभार मानताना चव्हाण यांनी दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे विशेष कौतुक केले.
शिवाजी गोरे
दापोली : शहराच्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ शेकडो हातांनी लोकसहभागातून श्रमदान केले. या श्रमदान मोहिमेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभागी होत या दापोली पॅटर्नचे कौतुक केले. दापोली नगरपंचायतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून राबविलेल्या श्रमदान मोहिमेत सहभागी झालेले सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांचे आभार मानताना चव्हाण यांनी दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे विशेष कौतुक केले.
दापोली शहराला पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत होती. या समस्येवर मात करण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील गाळ काढून या धरणाचे पुनरुज्जीवन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे नगराध्यक्षा उल्का जाधव व सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले.
नारगोली धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्याचा निर्णय झाला. दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील गाळउपसा करण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेत स्वखुशीने या कामासाठी लोकवर्गणी दिली. त्यामुळे धरणातील गाळउपसा व पुनरुज्जीवन कामाला गती मिळाली. धरणातील गाळाचा उपसा करण्यासाठी जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर, डिझेल व आर्थिक मदत करण्याचा निर्णय दापोली शहरातील अनेक दानशुरांनी घेतला.
राज्यात घाटमाथ्यावर पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असे काम सुरु आहे. त्याच धर्तीवर लोकसहभागातून श्रमदान ही संकल्पना दापोली नगरपंचायतीने राबवली असून, नारगोली धरणाच्या पुनरुज्जीवन कामासाठी हजारो हातांनी श्रमदान केले. या मोहिमेमुळे धरणातील पाणीसाठा वाढणार आहे.
दापोलीतील या श्रमदान मोहिमेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार घारे, दापोलीचे तालुका कृषी अधिकारी हाके, दापोलीचे पोलीस निरीक्षक अनिल लाड, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, युवा सेना कोअर कमिटी सदस्य योगेश कदम, नगराध्यक्षा उल्का जाधव, उपनगराध्यक्षा रजिया रखांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, नगरपंचायत कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.
नारगोली धरण दापोली शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य धरण असल्याने या धरणाचे काम योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्याचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असून, पिचींगसुद्धा कमकुवत झाली आहे. त्यामुळे या धरणाला लागणारा सरकारी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु.
- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी.
दापोली शहराची पाण्याची गरज ओळखून धरणाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून, लोकांनी यासाठी दाखवलेल्या सहभागामुळे भविष्यात दापोली शहराला पाणीटंचाईतून मुक्तता मिळेल.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी
दापोलीतील नागरिकांनी धरणाच्या कामात श्रमदानासाठी पुढाकार घेतल्याने मी जनतेची आभारी आहे. यापुढेही असेच सहकार्य मिळाल्यास दापोली शहराला कधीही पाणीटंचाई भासणार नाही.
- उल्का जाधव, नगराध्यक्षा
दापोली शहराला पाणीपुरवठा करणाºया नारगोली धरणाच्या कामासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढील काळात हे काम सुरु होईल. परंतु, एवढा निधी पुरणार नसल्यामुळे सध्या लोकसहभागातून सुरु असलेल्या कामाचा नक्कीच फायदा होणार आहे.
- योगेश कदम, युवा नेते.
पोलिसांचेही अमूल्य श्रमदान...
आपल्या दैनंदिन व्यस्त कार्यातून या माहिमेत पोलिसांनीही श्रमदान केले. दापोलीचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत श्रमदान करुन या माहिमेला सकारात्मक हातभार लावला. आपापला पेशा विसरून शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनीही श्रमदान केल्याने साºयांनाच या कामासाठी वेगळा हुरुप आला होता.
माझ्या कारकिर्दीत गाळउपसा होऊन धरणाचे पुनरुज्जीवन होत आहे हे माझे भाग्यच आहे.
- प्रकाश साळवी, पाणी सभापती