मान्सूनचा पाऊस बरसतोय श्रावण सरींनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:43+5:302021-06-22T04:21:43+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. सध्या पाऊस श्रावणातील सरींसारखा सुरू झाला आहे. मध्येच एखादी पावसाची ...
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. सध्या पाऊस श्रावणातील सरींसारखा सुरू झाला आहे. मध्येच एखादी पावसाची सर आणि क्षणार्धात ऊन पडू लागले आहे. रात्रीही पावसाची विश्रांती असते. गेल्या २४ तासांत एकूण १४१.२० मिलीमीटर (सरासरी १५.६९ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने चांगलाच जोर घेतला होता. आठवडाभर रात्री दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे काही दिवस रात्री पाऊस आणि दिवसा ऊन असा खेळ सुरू होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर एकदमच कमी झाला आहे.
मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने गेल्या वर्षीची आकडेवारी ओलांडली आहे. गेल्या वर्षी १ ते २१ जून या कालावधीत ५९० मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. यंदा या कालावधीत ७१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच १२० मिलीमीटरने अधिक पाऊस झाला आहे. मात्र, आता जोर कमी झाला आहे.
आता दिवसभरात पावसाची सर अधूनमधून येत असते. मात्र, दिवसभर ऊन पडलेले. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती अशी, मंडणगड तालुक्यात पुरार-म्हाप्रळ-मंडणगड रस्त्यावर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे हटविण्याचे काम चालू आहे. उर्वरित तालुक्यात कुठल्याही पावसाच्या घडामोडीची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झालेली नाही.