श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास उद्या प्रारंभ
By Admin | Published: March 11, 2017 06:25 PM2017-03-11T18:25:22+5:302017-03-11T18:25:22+5:30
मंदिराची रंगरंगोटी करून फुलांनी सुशोभित
श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास उद्या प्रारंभ
रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला १२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. शिमगोत्सवामुळे आसपासच्या गावातील अनेक पालख्या श्री भैरी भेटीला येत आहेत. उत्सवामुळे मंदिराची रंगरंगोटी करून फुलांनी सुशोभित करण्यात आले आहे.
फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरी भेटीसाठी बाहेर पडणार आहे. खालची आळी, महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर दीड वाजता जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी पालखी जोगेश्वरी मंदिरात जाईल. दि.१३ रोजी पहाटे तीन वाजता श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. झाडगाव सहाणेवरून झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, बंदररोडमार्गे मांडवी भडंग नाका, मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडे वठार, खडपे वठार, तेली आळी, राम नाका, राम मंदिर, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, विठ्ठल मंदिरकडून होळी घेण्यासाठी जाईल. होळीचा शेंडा घेऊन दुपारी झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभारण्यात येईल.
दि.१३ रोजी रात्री ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी निशाण निघणार आहे. निशाण झाडगावात फिरून, श्री देवी जोगेश्वरी मंदिरात जाईल, तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाऊंड, कुंभारवाडा, परटवणे, फगरवठार, वरच्या आळी, लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालणीच्या पारावर येईल. रात्री ११.३० वाजता पारावरून निशाणाचे तीन भाग करण्यात येणार आहेत. एक निशाण घेऊन गुरव मंडळी भैरी मंदिरात, दुसरा भाग गोखले नाका, राधाकृष्ण नाका, मच्छि मार्केट येथे जाईल.पुन्हा फिरून झारणी रोड, राम नाका, तेली आळी, रसाळ यांच्या तिठ्यावर येईल. ढमालणीच्या पारावरून तिसरा भाग पऱ्याची आळी, मारूती आळी, तेली आळीतून रसाळ यांच्या तिठ्यावर येईल. गोडीबाव नाका, खडपेवठार, तेथून निशाण राजिवड्यातील श्री काशि विश्वेश्वर मंदिरात येईल नंतर धुळवड साजरी होणार आहे. तेथून निशाण खडपेवठार, चवंडे वठार, विलणकरवाडी, श्री दत्त मंदिर नाका, घुडेवठार मांडवी येथील वारंग यांच्या घरी थांबेल. दि. १४ रोजी चौगुलेवाडी, कुरणवाडी, पेठकिल्ला राम मंदिर, सांब मंदिर, जोतिबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होऊन एक भाग राम मंदिराच्या मागील बाजूने जाऊन दुसरा भाग राम मंदिराच्या पुढील बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ, धुळवडीचे दोन भाग एकत्र येतील. पुढे भैरी मंदिर, खालची आळी, दांडा फिशरिज जवळून मुरूगवाडा विठ्ठलादेवी, पंधरा माड, मुरूगवाडा हद्दीजवळ जाऊन गाऱ्हाणे होऊन धुळवड परत मागे फिरून झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर यांच्या आवारात आलेनंतर धुळवडीचा कार्यक्रम संपेल.
दि.१५ ते १७ मार्च पर्यत दुपारी एक वाजेपर्यंत श्री देव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी थांबणार आहे. दि.१४ ते १६ मार्च रोजी रात्री १० नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचविण्यात येणार आहे.
दि. १६ रोजी भैरीची पालखी मुरूगवाड्यात ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. झाडगावमार्गे जोगेश्वरी मंदिर, खालची आळी, भैरी मंदिरमार्गे दांडा फॅक्टरी, पंधरा माडपर्यंत जाऊन परत सहाणेवर येईल. त्यानंतर पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. दि.१७ रोजी श्री भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी सहाणेवरून निघेल. पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्रसलामी घेऊन जोगेश्वरी मंदिरातून गाडीतळ , नवलाई-पावणाई मंदिर, शहर पोलिस ठाणे, धनजी नाका, राधाकृष्ण नाका, राम नाका, राम मंदिर, मारुती आळी, गोखले नाका, ढमालणीचा पार, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे भैरी मंदिराच्या प्रांगणात ११.३० वाजता नेण्यात येईल. रात्री बारा वाजता पालखी स्थानापन्न होऊन धुपारत, गावाचे गाऱ्हाणे होऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.(प्रतिनिधी)