श्रीराम दत्तसेवा संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:45+5:302021-03-25T04:29:45+5:30
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील शिवदत्त वेळणेश्वर कबड्डी संघाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय दोन दिवसीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत श्रीराम दत्तसेवा ...
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील शिवदत्त वेळणेश्वर कबड्डी संघाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय दोन दिवसीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत श्रीराम दत्तसेवा संघ आरे यांनी विजेतेपद पटकावले. फ्रेंड सर्कल खालचा पाट यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते.
मोरे यांचा सत्कार
दापोली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दापोली शाखेचे सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मोरे हे ३७ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. या निमित्ताने विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे सचिव मोरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक समीर दळवी, किरण शिंदे, दिनेश शेवडे, रवींद्र पावसे आदी उपस्थित होते.
कसोप किनाऱ्यावर स्वच्छता
रत्नागिरी : तालुक्यातील कसोप येथील समुद्र किनाऱ्यावर वुई ग्रुपतर्फे स्वच्छता करण्यात आली. वुई ग्रुपतर्फे स्वच्छता अभियानाचे पाचवे सत्र राबविण्यात आले. तरुणांनी ३० पोती कचरा संकलन करून किनारा स्वच्छ केला. भविष्यातही अशाचप्रकारे अभियान राबविण्यात येणार आहे.
बैठक लांबणीवर
खेड : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची सभा काँग्रेस भुवन येथे दिनांक २३ मार्च रोजी घेण्यात येणार होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव सभा रद्द करण्यात आली. मात्र लवकरच ती घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी होळीनंतरच सभा होणार असल्याची शक्यता आहे. सभेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.
प्रकल्पग्रस्तांची आज बैठक
चिपळूण : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिनांक २५ मार्च रोजी मंत्रालयामध्ये एक बैठक बोलावली आहे. चिपळूण, संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक तसेच महादेव चव्हाण, सुजीत झिमण यांच्यासह काही प्रकल्पग्रस्तांनी ३ मार्च रोजी भेट घेतली होती.
निवृत्ती वेतनासाठी प्रतीक्षा
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे निवृत्ती वेतन मार्च संपत आला तरी अद्याप जमा झालेले नाही. त्यामुळे वयोवृद्ध निवृत्ती वेतनधारकांवर अन्याय होत आहे. गेली सहा महिने निवृत्ती वेतन अनियमित होत आहे. याकडे अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
कलिंगडांना मागणी
रत्नागिरी : उष्मा वाढल्याने कलिंगडासाठी मागणी वाढत आहे. ठिकठिकाणी कलिंगड विक्रेते विक्रीसाठी बसत असून २० ते २५ रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. अखंड कलिंगडासह कापूनही कलिंगड देण्यात येत असल्याने ग्राहक सोयीनुसार खरेदी करीत आहेत.