नियमांची पायमल्ली करणाऱ्या धोकादायक कंपन्या बंद करा : योगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:50+5:302021-05-04T04:13:50+5:30
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात सातत्याने घडणाऱ्या स्फोटांमुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसह स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ...
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात सातत्याने घडणाऱ्या स्फोटांमुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसह स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या स्फोटांच्या मालिकांची गंभीर दखल घेत शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या धोकादायक कंपन्या तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत घडणाऱ्या स्फोटांबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन चर्चा करणार असून, अधिवेशनातही या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
गेल्या चार महिन्यांत सहा स्फोट झाले आहेत. यापूर्वी कंपन्यांमध्ये स्फोट होऊन कामगारांचा मृत्यूही झाला आहे. वारंवार होणाऱ्या या स्फोटांमुळे एमआयडीसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. इथल्या सर्व कंपन्या जुन्या झाल्या असल्यामुळे त्यांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत आमदार कदम यांनी या प्रश्नाबाबत अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे.