हज यात्रेसाठी पायी निघाला केरळचा सिहाब चोत्तूर, स्वागतासाठी लोटले असंख्य रत्नागिरीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:15 PM2022-06-28T19:15:16+5:302022-06-28T19:15:58+5:30
हज यात्रेसाठी पायी प्रवास करून हज पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेल्या सिहाबने दि. ३० मे रोजी केरळ येथून हज यात्रेला प्रारंभ केला. त्याच्यासमवेत त्याचा मित्र श्याम आहे.
रत्नागिरी : पवित्र हज यात्रेसाठी पायी निघालेल्या केरळच्या तीसवर्षीय सिहाब चोत्तूरच्या स्वागतासाठी पाली (ता. रत्नागिरी) येथे मोठ्या संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते. हवाईमार्गे हजयात्रा करणे सुलभ असताना श्रद्धा, चिकाटी या बळावर पायी जाण्याचे सिहाबचे ध्येय आहे. पाली येथे ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांनी सिहाबचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हज यात्रेसाठी पायी प्रवास करून हज पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेल्या सिहाबने दि. ३० मे रोजी केरळ येथून हज यात्रेला प्रारंभ केला. त्याच्यासमवेत त्याचा मित्र श्याम आहे. धर्म, जात बाजूला ठेवून केवळ आपल्या मित्राचे स्वप्न साकार होण्याच्या उद्देशाने तो त्याला सोबत करीत आहे. मात्र भारत देशाची सीमा पंजाबपर्यंत असल्याने श्याम तिथपर्यंत सोबत करणार आहे. श्याम सायकलवरून सिहाबबरोबर प्रवास करीत आहे.
मित्र घेत आहेत काळजी
याशिवाय केरळ येथून आणखी दोन वाहनांतून त्याचे मित्र सोबत आले आहेत. हे मित्र वाहनातून सिहाबसाठी प्रवास करीत आहेत. पायी हजयात्रा पूर्ण करण्याची सिहाबची मनोकामना पूर्ण होण्यासाठी वाटेत त्याला कसलाही त्रास होऊ नये, याची काळजी हे मित्र घेत आहेत. भारतातून पाकिस्तान व तेथून अन्य देशांत सिहाब मार्गाक्रमण करणार आहे. त्या-त्या देशांतील केरळवासीय भाविक त्याला पायी सोबत करणार आहेत.
चालत निघालेल्या या यात्रेकरूचे सुरुवातीला पाली येथे उद्योजक अण्णा सामंत यांनी स्वागत केले. त्या वेळी मजगावचे सरपंच फैय्याज मुकादम, अजिम चिकटे, फैसल मुल्ला, मुझफ्फर मुकादम, तनवीर काजी, साहिल पठाण उपस्थित होते.
नियोजनासाठी तब्बल आठ वर्षे
सोमवारी दुपारी एक वाजता हातखंबा येथे सिहाबचे आगमन होताच शेकडो हिंदू-मुस्लिम बांधवांनी त्याचे स्वागत केले. हा नेत्रदीपक सोहळा मोबाईलमध्ये टिपण्यात आला. आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सिहाब याला नियोजन करण्यासाठी तब्बल आठ वर्षे लागली. केरळ ते रत्नागिरी हा २८ दिवसांचा पायी प्रवास जवळजवळ एक हजार किलोमीटर इतका झाला. पाच देश चालत गेल्यावर सौदी अरेबिया या देशात पोहोचायला त्याला सन २०२३ वर्ष उजाडणार आहे. त्याचा हा पायी प्रवास सुखाचा होवो आणि हजयात्रा पूर्ण होवो, ही प्रार्थना समस्त उपस्थितांनी केली.