silver oak attack: चिपळुणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध, पण चर्चा ‘टायमिंग’चीच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:41 PM2022-04-09T14:41:37+5:302022-04-09T14:42:10+5:30
पुरेशी संख्या हाेण्याआधी, पदाधिकाऱ्यांना वेळ देईपर्यंत तालुकाध्यक्षांनी माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत आंदाेलन उरकून घेतले.
चिपळूण : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंचनाका येथे निषेध केला. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात घोषणा देत पाेलीस स्थानकापर्यंत मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले.
मात्र, पुरेशी संख्या हाेण्याआधी, पदाधिकाऱ्यांना वेळ देईपर्यंत तालुकाध्यक्षांनी माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत आंदाेलन उरकून घेतले. त्यामुळे या माेर्चात राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांचे ‘टायमिंग’ जुळले नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट शुक्रवारी आक्रमक झाला हाेता. या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पलफेकही केली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंचनाका ते चिपळूण पोलीस स्थानकापर्यंत मोर्चा काढला.
चिपळुणातील चिंचनाका येथे सकाळी ११ वाजता जमण्याचे निश्चित करण्यात आले. दहा मिनिटात सुमारे ५० जण त्याठिकाणी एकत्र आले. परंतु, पुरेशी संख्या हाेण्याआधीच तालुकाध्यक्षांनी घाई सुरु केली. अवघे दाेन मिनिट थांबून तालुकाध्यक्षांनी साऱ्यांना घेऊन माेर्चा काढला. हा माेर्चा अर्ध्या वाटेवर पाेहाेचल्यानंतर खेर्डी, पाेफळी भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते चिंचनाक्यात आले. मात्र, तेथे काेणीच नसल्याचे पाहून नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्येच वेळेचे गणित न जमल्याने माेजक्याच लाेकात हा माेर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.