गणपतिपुळेतील शिमगाेत्सव साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:46+5:302021-04-05T04:27:46+5:30
गणपतिपुळे : येथे दरवर्षी माेठ्या थाटामाटात व धूमधुडाक्यात साजरा हाेणारा शिमगाेत्सव यावर्षी मात्र काेराेनामुळे अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. ...
गणपतिपुळे : येथे दरवर्षी माेठ्या थाटामाटात व धूमधुडाक्यात साजरा हाेणारा शिमगाेत्सव यावर्षी मात्र काेराेनामुळे अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. या उत्सवाची गुढीपाडव्याला सांगता हाेणार आहे.
ग्रामदेवता चंडिकादेवीची हाेळी पेटविण्यात आली. त्यानंतर पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. प्रदक्षिणा झाल्यानंतर सुर्वे यांची हाेळी पेटविण्यात आली. त्यानंतर पालखी मंदिराच्या सभामंडपामध्ये आली. दुसऱ्या दिवशी ग्रामदेवता चंडिकादेवीच्या सासरकडील माेजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेची पालखी नेण्यात आली. त्या ठिकाणी गावातील प्रत्येक घरातील सुवासिनींकडून पूजा व ओटी भरण्यात आली. त्यानंतर १ एप्रिल राेजी ग्रामदेवतेची पालखी पुन्हा गणपतिपुळे येथे सहाणेवर बसविण्यात आली. या ठिकाणी सर्व मान घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी पुन्हा चंडिका मंदिरामधील सभामंडपामध्ये विराजमान झाली.
सध्या ग्रामदेवता चंडिकादेवीची पालखी मंदिराच्या सभामंडपामध्ये विराजमान आहे. जशी ग्रामदेवता पूजा घेण्यासाठी घराेघरी जायची त्याप्रमाणे प्रत्येक वाडीला ओटी भरण्यासाठी दिवस देण्यात आला आहे. येथील मानेवाडी, बागवाडी, ब्राह्मणवाडी, केदारवाडी, साेनारवाडी, न्हावीवठार आदी वाड्यांवरील ग्रामस्थ ठरवून दिलेल्या दिवशी ओटी भरणाचा व दर्शनाचा लाभ घेणार आहेत. संपूर्ण गावाकडून ओटी भरण झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री देवीची पालखी मंदिरात प्रवेश करेल. त्यानंतर गणपतिपुळे गावच्या शिमगाेत्सवाची सांगता हाेणार आहे.
चाैकट
ग्रामस्थ नाराज
गेल्यावर्षी ग्रामदेवता चंडिकादेवीची पालखी मालेवाडी, बागवाडी, ब्राह्मणवाडीपर्यंत आल्यानंतर अचानक दुपारी पालखी मंदिरात नेण्याचे प्रशासनाकडून आदेश आल्याने केदारवाडीत काेणाच्याच घरात पालखी पूजा घेण्यासाठी गेली नाही. त्यामुळे गेल्यावर्षी केदारवाडीतील ग्रामस्थ नाराज हाेते. यावर्षी तरी ग्रामदेवता चंडिकादेवी आपल्या घरी येईल या आशेने केदारवाडीकर डाेळे लावून बसले हाेते. मात्र यावर्षीही या आशेवर विरजण पडले.