SSC Result2024: कोकण विभागात सिंधुदूर्ग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी
By मेहरून नाकाडे | Published: May 27, 2024 04:00 PM2024-05-27T16:00:30+5:302024-05-27T16:02:26+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात झाली वाढ
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २७ मे) जाहीर झाला असून एकूण निकाल ९९.०१ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात ०.९ टक्के इतकी वाढ झाली आहे.
कोकण मंडळापाठोपाठ कोल्हापूर मंडळाचा ९७.४५ टक्के, तर पुणे मंडळाचा ९६.४४ टक्के इतका निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर मंडळाचा असून ९४.७३ टक्के इतका लागला आहे.
रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून २६ हजार ७८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी २६ हजार ५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार ७३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १३ हजार ५५१ विद्यार्थी पास झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.६६ टक्के लागला आहे. कोकणातून १३ हजार ४५ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी १२ हजार ९६६ विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.७३ टक्के अधिक आहे.
सिंधुदूर्गचा निकाल ९९.३५ टक्के
सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ७८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ८ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९९.३५ टक्के लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ४ हजार ५७६ मुलगे परीक्षेला बसले होते त्यापैकी ४ हजार ५३५ मुलगे पास झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.१० टक्के आहे. जिल्ह्यातून चार हजार २१२ मुली परीक्षेस बसल्या होत्या पैकी चार हजार १९६ मुली पास झाल्या असून उत्तीर्णत्तेचे प्रमाण ९९.६२ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.५२ टक्केने अधिक आहे.
रत्नागिरीचा निकाल ९८.८५ टक्के
रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार ९९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १७ हजार ७८६ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.८५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ९१५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ९०१६ विद्यार्थी पास झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२८ टक्के लागला आहे. ८८३३ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या पैकी ८७७० विद्यार्थिनी पास झाल्या असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२८ टक्के लागला आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.७५ टक्केने अधिक आहे.