विविध संगीत प्रकारांनी रंगले गायक-वादक संमेलन
By admin | Published: May 19, 2016 11:53 PM2016-05-19T23:53:30+5:302016-05-19T23:56:59+5:30
जुन्या कलाकारांच्या आठवणी : स्थानिक कलाकारांना प्रेक्षकांची दाद
रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात रविवारी विविध संगीत प्रकारांनी ‘गायक-वादक संमेलन’ रंगले. शास्त्रीय, उपशास्त्रीय, एकलवादन, रत्नागिरीतील संगीतकारांच्या रचना, सुगम संगीत आणि फ्युजन अशा संगीत प्रकारांनी हे संमेलन रंगले.
शास्त्रीय गायक प्रसाद गुळवणी, मोहनवीणावादक सुभाष गोसावी, गायिका मुग्धा भट सामंत, जगन्नाथ जोशी, श्रीकृष्ण मुळ्ये, विलास हर्षे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी जगन्नाथ जोशी, मृणाल परांजपे, अमेय आखवे, अजिंंक्य पोंक्षे, ईशानी पाटणकर, रागिनी बाणे, राधा भट, सावनी नाटेकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यानंतर उपशास्त्रीय गायनामध्ये आसावरी परांजपे, प्राजक्ता लेले, चैत्राली देसाई यांनी रचना सादर केल्या.
उपशास्त्रीय गायनानंतर एकलवादन सादर करण्यात आले. यामध्ये निरंजन गोडबोले, वरद सोहोनी यांनी हार्मोनियम सोलो, अभय भावे, प्रसन्न जोशी यांनी बासरी सोलो, केदार टिकेकरने तबला सोलो, तर शौनक माईणकर याने सतारवादन आणि प्रथमेश तारळकर याने पखवाज सोलो सादर केला. सुगम संगीतात नरेंद्र रानडे, अंजली लिमये, अभिजित भट, सिद्धी बोंद्रे, प्रिया गोखले, केतकी पेठे, अमेय आखवे, स्नेहल वैशंपायन, संगीता शेवाळे, अभय मुळ्ये, तृप्ती महाजन, पर्शराम केळकर, जाई आगाशे यांनी सुगमसंध्या ‘प्रीती ते भक्ती’मध्ये रंगत आणली. संमेलनाची सांगता ‘फ्यूजन’च्या आगळेपणाने झाली. गिटारवादक मिलिंद गोवेकर, शैलेश गोवेकर, सिंंथेसायझरिस्ट राजू किल्लेकर आणि तबलावादक पांडुरंग बर्वे यांनी फ्यूजनचा मेळ घातला होता.
संमेलनामध्ये हार्मोनियमसाठी महेश दामले, मधुसुदन लेले, चैतन्य पटवर्धन, संतोष आठवले, मंगेश मोरे, निरंजन गोडबोले, राजेंद्र भडसावळे, तर तबलासाथ प्रथमेश शहाणे, रोहन सावंत, केदार लिंंगायत, निखिल रानडे, सौरभ हर्षे यांनी साथसंगत केली. आयोजनामध्ये प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर, व्हायोलिनवादक उदय गोखले, हार्मोनियमवादक चैतन्य पटवर्धन तसेच संगीततज्ज्ञ विजय रानडे, आॅर्गनवादक विलास हर्षे, गायिका संध्या सुर्वे यांनी विविध संगीत प्रकारातील मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. मीरा भावे, दीप्ती कुवळेकर, गौरी केळकर यांनी निवेदन केले. संमेलनामध्ये डॉक्युमेंट्रीद्वारे रत्नागिरीतील जुन्या दिग्गज कलावंतांच्या आठवणी ताज्या करण्यात आल्या. अभिजित भट यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली होती. रंगमंचावर आनंद पाटणकर, मिलिंद टिकेकर, हेरंब जोगळेकर, पांडुरंग बर्वे यांनी रत्नागिरीतील जुन्या कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.
आनंद प्रभुदेसाई, तसेच रत्नागिरीत पहिल्यांदा वाद्यवृंद मैफल संकल्पना सुरू करून रूजविणारे विजय डाफळे, नृत्यगुरू बाळासाहेब हिरेमठ, हार्मोनियमवादक श्रीकृष्ण मुळ्ये, शास्त्रीय गायक बंडुकाका भागवत यांचा निवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
संमेलनात वेगळेपण
संमेलनात अभंग, भक्तीगीत, भावगीतासह शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि पाश्चात्य संगीत प्रकारही सादर झाले. रत्नागिरीतील संगीतकारांच्या नवीन संगीतरचना सादर झाल्या. यामध्ये संगीततज्ज्ञ विजय रानडे, आनंद पाटणकर, आनंद प्रभुदेसाई, तसेच नितीन लिमये, प्रतीक जोशी, ओंकार संसारे, ओंकार बंडबे, रवींद्र मेहेंदळे, अभिजित नांदगावकर, श्वेता जोगळेकर यांच्या नव्या रचनांनी संमेलनातील वेगळेपण जपले.