एकाच खोलीत शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’

By admin | Published: April 14, 2016 10:01 PM2016-04-14T22:01:34+5:302016-04-14T22:01:34+5:30

राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ : व्हिक्टोरिया महाराणीच्या निधीतून उभी राहिली शाळेची इमारत

In 'Single Room' | एकाच खोलीत शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’

एकाच खोलीत शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’

Next

विनोद पवार -- राजापूर --चार मोडकी-तोडकी बाके, फळे, नकाशे एवढ्या तुटपुंज्या साहित्यासह केवळ ३० विद्यार्थ्यांसह एकाच खोलीत तीन इयत्ता सुरु करुन सन १८९०च्या एप्रिल महिन्यात राजापुरातील तत्कालीन लोकप्रिय व शिक्षणप्रेमी मामलेदार कै. भिकाजीकृष्ण पटर्वधन, प्रतिष्ठित नागरिक कै. वासुदेव मोरेश्वर पोतदार यांनी माध्यमिक शिक्षणाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने इंग्रजी शाळेची सुरुवात केली. त्यालाच ^‘प्रायव्हेट अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल’ असे म्हणत. १२५ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या शाळेने आजपर्यंत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देत आपला विस्तार अक्षरश वटवृक्षाप्रमाणे वाढवला आहे.इतिहास काळात राजापूर शहर कोकण प्रांतात मलबारी वरघाटी मालाच्या देवघेवीचे प्रमुख केंद्र म्हणून सुपरिचित होते. राजापूर शहराच्या या वैभवाकडेच आकृष्ट होऊन त्याकाळी फ्रेंच, डच व इंग्रज व्यापाऱ्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या होत्या. राजापूर शहर त्याकाळी घोड्यांच्या व शिशाच्या व्यापारासाठीही प्रसिध्द असल्याचे दाखले इतिहासात पहावयास मिळतात. परंतु, याच कालखंडात येथील व्यापाराला उतरती कळा लागली. राजापुरातील गंगेच्या पवित्र स्थानामुळे व गरम पाण्याच्या झऱ्यामुळे राजापूरची ख्याती सर्वदूर पसरलेली असतानाच काळाचा बदलता ओघ ओळखून विद्याधनाची व ज्ञानाची जोपासना करण्याकडे येथील समाजधुरिणांनी लक्ष वेधले. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे व ज्ञानाचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा यासाठी त्यांनी शाळा सुरु केली.
१८९१ साली शाळेला सरकारी अनुदान मिळू लागले. मात्र, १९०० सालापर्यंत शाळेला स्वत:ची इमारत नव्हती. ती गरज १९०० साली व्हिक्टोरिया महाराणी निधीतून काही रक्कम मिळाल्याने पूर्ण झाली. सन १९०३ साली शाळेची मुख्य इमारत व पहिला मजला पूर्ण झाला. शाळा स्वत:च्या जागेत भरु लागली. दरम्यानच्या काळात १९०५ साली शाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षक म्हणून कै. रामचंद्र महादेव रानडे यांची नियुक्ती झाली व १९०६ मध्ये शाळेत चित्रकला परीक्षा केंद्र सुरु झाले. सन १९१३ मध्ये शाळेने प्रथमच मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रीक व स्कूल फायनल परीक्षेसाठी विद्यार्थी पाठवले. पहिल्याच वर्षी आठ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सन १९१६पर्यंत शाळेच्या व्यायामशाळा व प्रयोगशाळा इमारती पूर्ण झाल्या. त्यावेळी विद्यार्थी संख्या २२५च्या वर गेली होती मॅट्रीकचे निकालही चांगले लागत असल्यामुळे शाळेचा दर्जा वाढत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे १९१६ साली शाळेला शिक्षण खात्याकडून कायमस्वरुपी मान्यता मिळाली. सन १९२३मध्ये शााळेत सुतारकाम विषयाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला.
शाळेचा वाढत जाणारा डोलारा पाहता व वाढत्या आकांक्षा व गरजा यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याकरिता ६ जुलै १९२४ रोजी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली व हायस्कूलची सर्व व्यवस्था सोपवण्यात आली. सन १९२७मध्ये राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाची कायदेशीर नोंदणी झाल्यानंतर सन १९२९ मध्ये शेती विषयक अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला. प्रारंभी शेतीशाळा नजिकच्या हर्डी गावातील ३ एकर जागेत सुरु करण्यात आली. मात्र, शेतीशाळेचा वाढता विस्तार पाहता १९३५ मध्ये शहरानजिकच्या कोदवली येथील १० एकर क्षेत्रात शेतीशाळेचे स्थलांतर करण्यात आले. सन १९३७ मध्ये शेतीशाळेचे वसतिगृह बांधण्यात आले. दरम्यानच्या काळात १९३४मध्ये शाळेने ‘रत्नदीप’ नावाचे त्रैमासिक सुरु केले. तर सन १९३४ - ३५ मध्ये संस्थेच्या शेतीशाळेला सरकारी मान्यताही मिळाली.
सन १९४० नंतर शाळेने व्यवसाय शिक्षणाच्या संधी राजापूर येथील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या. त्यामध्ये १९४२ साली चित्रकला वर्ग , १९४४ साली कागदकाम, १९४५ साली शिवणकाम, १९४८ साली व्यापार या विषयांचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. त्यामुळे सन १९४९ मध्ये शाळेला विविधांगी शिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली. सन १९५४ मध्ये अध्यापक विद्यालयाच्या रुपाने आणखी एक मानाचा तुरा संस्थेच्या शिरपेचात रोवला गेला. सरकारमान्य टायपिंंग कोर्स, ललितकला, संगीत असे विविध विभागही सुरु करण्यात आले. १९६० साली एनसीसी, १९६२ साली लष्करी अभ्यास असे सर्व विविधांगी अभ्यासक्रम सुरु करुन शाळेने नावलौकीक प्राप्त केला.


कै. भास्करभाऊ हर्डिकर हे या शाळेचे अगदी पहिले शिक्षक. त्यांच्याबरोबर कै. वासुदेव केशव दात्ये , कै. सदाशिव भिकाजी गोडे , कै. गोविंंद सखाराम सरदेसाई, कै. दत्तात्रय बचाजी फडके , कै. विनायक विष्णू लेले, कै. विनायक सदाशिव बर्वे, कै. रामचंद्र महादेव रानडे, कै. हरी सदाशिव बेलवलकर यासारख्या चांगल्या शिक्षकांची जोड मिळल्याने सुरुवातीला दहा वर्षाच्या काळातच शाळा नावलौकीकास आली.
शताब्दीकडे वाटचाल करत असताना शाळेला व संस्थेला काही स्थित्यंतरांमधून जावे लागले. संपूर्ण भारतभर १० + २ + ३ हा आकृतीबंध लागू होईपर्यंत विविध अभ्यास्रकम शाळेमध्ये उपलब्ध करुन दिले गेले होते. मात्र, १९७५ पासून व्यवसाय शिक्षणाचे महत्व कमी झाल्याने त्या सर्व विषयांचा समावेश कार्यानुभव या विषयात करण्यात आला. या विषयाचा सर्वात मोठा परिणाम हायस्कूलवर झाला. मात्र, त्यानंतर हार न मानता संस्थेने १९७५ साली कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले तर १९७६ साली मुद्रणकला हा विषयही सुरु करण्यात आला. १९७५ नंतरची नवी आव्हाने म्हणजे शाळेच्या संक्रमणाचा कालखंड होता. मात्र, या कालखंडातही शाळेने आपली वाटचाल यशस्वीपणे सुरु ठेवली.

राजापूर येथील शैक्षणिक वैभवात भर टाकणारी ही इमारत आजही दिमाखात उभी आहे. १२५ वर्षापासून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शाळेने नेहमीच प्रयत्न केले आहेत. कधी कधी फी माफ करुनही काही विद्यार्थ्यांना शाळेने शिकवले. १९९१ नंतर शाळेने नव्या दमाने पुन्हा आपल्या ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली. आय. टी., ई-लर्निग, सेमी इंग्लिश याबरोबरच संस्थेने आता इंग्लिश मीडिअम स्कूलही सुरु केले आहे. माजी विद्यार्थ्यांमार्फत चालवली जाणारी ही एकमेव संस्था असावी.
राजापूरच्या शैक्षणिक वैभवात भर टाकणारी राजापूर
 

Web Title: In 'Single Room'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.