साहेब, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:02+5:302021-07-26T04:29:02+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ‘आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा, ...

Sir, don't go without helping us | साहेब, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका

साहेब, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : ‘आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा, एकवेळ आमदार, खासदारांचे दाेनवेळचे पगार काेकणाकडे वळवा पण आम्हाला मदत दिल्याशिवाय जाऊ नका’, असा टाहाे चिपळुणातील नुकसानग्रस्त महिलेने मुख्यमंंत्र्यांसमाेर फाेडला.

‘तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी १ वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांचे आणि स्थानिकांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

यावेळी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं, असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुमच्या मालाचं बघू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Sir, don't go without helping us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.