साहेब, लॉकडाऊनपेक्षा कोरोनानेच मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:08 PM2021-04-07T18:08:58+5:302021-04-07T18:09:58+5:30
CoronaVirus Chiplun Ratnagiri- साहेब मिनी लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय हो? व्यापाऱ्याने सर्व नियम पाळायचे, घरपट्टी, पाणीपट्टी, लाईटबिल, जीएसटी सारखे कर भरायचे आणि बँकेतील हप्ते, कामगारांची प्रत्येकी ५०० रुपये मोजून आरटीपीसीआर तपासणी हे सर्व व्यापाऱ्यांनी करायचे. मग व्यापाऱ्यांसाठी सरकार व प्रशासन नेमके काय करीत आहे. व्यापाऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या आहेत. तेव्हा शासनाने महसूल मिळणाऱ्या दुकानांना सूट देणारा लॉकडाऊन करण्यापेक्षा व्यापारी कोरोनानेच मेलेला बरा, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी मंगळवारीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
चिपळूण : साहेब मिनी लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय हो? व्यापाऱ्याने सर्व नियम पाळायचे, घरपट्टी, पाणीपट्टी, लाईटबिल, जीएसटी सारखे कर भरायचे आणि बँकेतील हप्ते, कामगारांची प्रत्येकी ५०० रुपये मोजून आरटीपीसीआर तपासणी हे सर्व व्यापाऱ्यांनी करायचे. मग व्यापाऱ्यांसाठी सरकार व प्रशासन नेमके काय करीत आहे. व्यापाऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या आहेत. तेव्हा शासनाने महसूल मिळणाऱ्या दुकानांना सूट देणारा लॉकडाऊन करण्यापेक्षा व्यापारी कोरोनानेच मेलेला बरा, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी मंगळवारीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, दुकाने बंद राहणार आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व्यापाऱ्यांसह अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही यावरून संभ्रम होता. आदेशाविषयीची स्पष्टता झाल्यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत आदींच्या उपस्थित मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली.
बैठकीत शासन आदेशानाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार सूर्यवंशी यांनी मागील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली होती. गरजूंच्या मदतीसाठी व्यापारी पुढे आले होते. आताही सर्वानी सहकार्याची भूमिका घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाच्या अंतिम टप्प्यात सहकार्याची अपेक्षा आहे. प्रशासन दडपशाहीची भूमिका घेणार नाही. मात्र शासन आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
यावेळी ज्येष्ठ व्यापारी बापू काणे, अरुण भोजने, किशोर रेडीज यांनी सर्व कर आम्ही भरायचे. इमान इतबारे धंदा करायचा. व्यापाऱ्यांना काय सुविधा दिल्यात. व्यापाऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे. असं मारण्यापेक्षा कोरोनाने मेलंलं चांगलं. एसटी बस सेवा सुरू, मग आम्हाला का रोखता?. आम्ही सहकार्य करणारी, नियम पळणारे आहोत, तेव्हा आमचा विचार करा. सर्वच बंद करा, महसूल साठी दुजाभाव करू नका, असे सांगितले. यावर तहसीलदार सूर्यवंशी यांनी तुमच्या सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविल्या जातील, असे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी म्हणाले की, हा अनलिमिटेड लॉकडाउन नाही. ३० एप्रिलपर्यंत सहकार्य अपेक्षित आहे.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे, सुचय रेडीज, सिद्धेश लाड, विश्वास चितळे, राजेंद्र वेस्वीकर, बिलाल पालकर, कांता चिपळूणकर, अनिल दाभोळकर, विजय गांधी, शैलेश वरवाटकर, विजय चितळे, योगेश कुष्टे, श्रीकृष्ण खेडेकर, दिलीप जैन यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.