राजापुरातील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा हाेणार हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:17+5:302021-04-04T04:33:17+5:30
राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्यानजीकची जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी काही रक्कम पालिकेकडून शासनाकडे जमा ...
राजापूर :
राजापूर शहरातील मुख्य रस्त्यानजीकची जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी काही रक्कम पालिकेकडून शासनाकडे जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेला १७ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा नगरोत्थानमधून मंजूर झाला असून, या निधीतून संबंधित रक्कम शासनाकडे लवकरच जमा केली जाणार आहे. त्यामुळे रखडलेले जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचे हस्तांतरण आता मार्गी लागणार आहे.
शहरातील राजापूर हायस्कूलच्या समोर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते. त्याचे नगरपालिकेतर्फे व्यवस्थापन केले जात होते. मर्यादित उत्पन्न असलेल्या ‘क’ वर्गीय पालिकेला त्यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा खर्च पेलवणार नसल्याने ही जागा व इमारत १९८८ मध्ये शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे १४ गुंठे जागेसह दवाखाना इमारत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतींचे हस्तांतरण करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार आरोग्य विभागातर्फे सुरू झाला.
मात्र, काही वर्षांनंतर जीर्ण झालेली ही इमात ढासळून धोदाकायक बनली होती. पावसाळ्यात इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती, तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला होता. याचदरम्यान ग्रामीण रुग्णालयासाठी नवी इमारत मंजूर होऊन त्यासाठी सुमारे २ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातून मुख्य रस्त्यालगत न्यायालयाच्या समोर रूग्णालयाची अद्ययावत इमारत आणि अधिकारी, कर्मचारी यांचे निवासी संकुल उभारण्यात आले. या नव्या इमारतीमध्ये २००७ साली ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाल्यापासून जुनी रुग्णालयाची इमारत व जागा वापराविना पडून आहे.
शहर विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेली ही जागा हस्तांतरित व्हावी, अशी मागणी पालिकेने शासनाकडे वारंवार केली हाेती. माजी आमदार हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन जागा हस्तांतरणासाठी शासनाकडे जमा करावयाच्या रकमेसाठी लागणारा १७ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा नगरोत्थानमधून मंजूर झाला आहे. हा निधी लवकरच शासनाकडे जमा केला जाणार आहे. त्यानंतर, ही जागा पालिकेकडे हस्तांतरित होणार आहे.