एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:47 PM2017-10-19T23:47:51+5:302017-10-19T23:47:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत नसल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे.
सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस्. टी. महामंडळाच्या चालक, वाहक व इतर कर्मचाºयांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली़ ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वर्षभरात सणासुदीच्या दिवशी गावाकडे येणारे चाकरमानी, कामानिमित्त स्थलांतरित झालेली कुटुंब या संपामुळे अडचणीत सापडली आहेत़
रत्नागिरी जिल्ह्यात दररोज हजारो बसफेºया सुरु असतात़ या संपामुळे गेल्या तीन दिवसांत सर्वच फेºया बंद आहेत. दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून, घरची मंडळी बाहेरगावी वास्तव्याला असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बससेवाच ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
मुंबई, पुणे येथे असलेल्या अनेक चाकरमान्यांनी रेल्वे, खासगी वाहतूक सेवेचा आधार घेतला आहे. तरीही रेल्वे स्थानकापर्यंत येणारे बहुतांश प्रवाशी ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यासमोर गावाला जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एस.टी. बंद असल्याने अनेक प्रवाशांनी रिक्षा, खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र, त्यासाठी एस. टी. भाड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे खिशालाही मोठा फटका बसलेला आहे.
एस्. टी. महामंडळाचे चालक, वाहक, अधिकारी आणि इतर कर्मचारी संपावर गेल्याने महामंडळ प्रशासनाला गोरगरिबांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या कामानिमित्त शहरात येणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेची शहरी भागाशी नाळ जोडलेली असल्याने बहुतांशी व्यवहार शहरी भागावर अवलंबून असतात. संपामुळे हे व्यवहारही थांबले आहेत.