मच्छीमारांची स्थिती बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:02+5:302021-05-30T04:25:02+5:30
सुरुवातीलाच मासेमारी सुरु होणार असली, तरी लॉकडाऊनमुळे उत्पादित मासळीच्या निर्यातीवर असलेले निर्बंध आणि मासेमारी हंगाम उशिरा सुरु होणार ...
सुरुवातीलाच मासेमारी सुरु होणार असली, तरी लॉकडाऊनमुळे उत्पादित मासळीच्या निर्यातीवर असलेले निर्बंध आणि मासेमारी हंगाम उशिरा सुरु होणार असल्याने मच्छीमार समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या मासेमारी हंगामाप्रमाणेच कोरोनामुळे यंदाचा हंगामही अडचणीत असल्याने मच्छीमार हताश झाला आहे.
मासेमारी व्यवसायावर जिल्ह्याची आर्थिक नाडी अवलंबून आहे. या व्यवसायावर अनेक छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून आहेत. किनारपट्टीवरील प्रमुख व्यवसाय म्हणून गणल्या गेलेल्या मासेमारी व्यवसायाची स्थिती फार बिकट आहे. गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायावर अवकळा कोसळली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी अनेकदा मच्छी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती़. ही मागणी शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मच्छिमारांची आर्थिक स्थिती फार हालाखीची झाली आहे.
गतवर्षीही मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला वादळी हवामानामुळे दि़. १ ऑगस्ट रोजी खोल समुद्रातील मासेमारी झाली नव्हतीे. मागील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात झालेल्या दोन चक्रीवादळांमुळे सुमारे १५ दिवस मासेमारी ठप्प झाली होती. नौका किनारी नांगरावर ठेवण्यात आल्या होत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. अनेक नौका चक्रीवादळांमुळे समुद्रातून माघारी आल्या होत्या. त्यामुळे चालू हंगामात सुरुवातीलाच दिवस वाया गेल्याने मच्छिमारांना नुकसान सोसावे लागले होते.
दरम्यान, सुरुवातीच्या हंगामातच डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत मासेमारी चांगल्याप्रकारे होते. मात्र, त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मासेमारीवर वातावरणाचा काहीसा परिणाम होऊन प्रमाण कमी असते. त्यानंतर मार्च महिन्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन मच्छिमारांना त्याचा फायदा होतो़. मात्र, त्यानंतर मच्छिमारांच्या आशेवर पाणी फिरले. राज्यातच नव्हे तर संपूर्ण किनारपट्टीवर कोरोनाचे सावट पसरले होते. मार्च, २०२०पासून कोरोना महामारीने डोके वर काढल्याने लॉकडाऊन करणे शासनाला भाग पडले होते. त्याचा परिणाम मासेमारीवर झाला होता. लॉकडाऊनमुळे माशांची निर्यातीसाठी करण्यात येणारी वाहतूक ठप्प झाली होती़. त्यामुळे मासेमारीचे आणखी दोन महिने थंडावल्याने नौकांना नांगराला लावून ठेवण्यात आले होते.
कोरोनामुळे मासेमारी बंद ठेवण्यात आल्याने मच्छिमारांना खलाशांचा खर्च करावा लागत होता. अनेक खलाशी नौकामालकांना न सांगताच निघून गेले होते. त्यामुळे अनेक नौकामालकांचे लाखो रुपये पाण्यात गेले. त्यातच मासेमारी नसल्याने नौकामालक अडचणीत आले होते. कोरोनाच्या कालावधीत मासेमारी नसल्याने मच्छिमारांना खलाशांचा पगार देता येत नव्हता. मात्र, त्यांना जेवण व इतर खर्च करावा लागत होता. त्याचबरोबर कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांनी तगादा लावला होता. त्यामुळे मच्छिमारांसमोर पुढील हंगामात खर्च कुठून करायचा, असा प्रश्न होता.
एलईडीने मासेमारीवर कारवाई
जिल्ह्यातील अनेक मासेमारी नौकांकडून खोल समुद्रातील मासेमारीसाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येते. त्यामध्ये एलईडीने मासेमारी करण्यावर भर देण्यात येत होता. त्याचा फटका इतर मच्छिमारांना बसत होता. त्यामुळे एलईडीने मासेमारी करण्याला पारंपरिक मच्छिमारांकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यावर मत्स्य विभागानेही एलईडीने मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रहिम दलाल