रस्ता पाण्याखाली गेल्याने कोंढेतड नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 05:13 PM2017-07-22T17:13:34+5:302017-07-22T17:13:34+5:30
अर्जुना नदीच्या पाण्याच्या वेढ्याने वाहतूक ठप्प
आॅनलाईन लोकमत
राजापूर (जि. रत्नागिरी), दि. २२ : सुमारे चार कोटी रुपये निधीतून राजापूर शहर व कोंढेतड यांना जोडणारा पूल बांधण्यात आला. मात्र, पावसाळ्यात अर्जुना नदीच्या पाण्याचाच वेढा या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला पडल्याने त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून, या पुलाचा नक्की फायदा काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजापूर शहरातील चिंचबांध ते कोंढेतड यादरम्यान कायमस्वरुपी वाहतुकीसाठी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेदेखील झाली होती. अखेर शासनाकडून या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली व त्यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली. मात्र, कुर्मगतीने या पुलाचे काम सुरु राहिल्याने पुलाचा खर्च वाढत वाढत चार कोटींच्या घरात गेला. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने पुलावर लक्ष केंद्रीत करुन त्याचे बांधकाम गत उन्हाळ्यात पूर्ण करुन घेतले. या पुलाला शहराकडे जोडणारा पक्क्या स्वरुपातील रस्ता होणे बाकी होते. तरीही या पुलावरुन छोट्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली.
मात्र, गेले दोन दिवस सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूरजवळील अर्जुना नदीला मोठा पूर आल्याने त्यामध्ये कोंढेतड पुलाला जोडणारा रस्तादेखील बराचवेळ पाण्याखाली होता. त्यामुळे या पावसाळ्यात पुलावरुन सुरळीत ये - जा करायला मिळेल, अशी आशा असलेल्या येथील नागरिकांना पुलाला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याचे पाहून निराश व्हावे लागले. त्यामुळे ऐन पावसाळ््यातही या पुलाचा उपयोग करता आलेला नाही.