परिस्थिती गंभीर, घरी राहणे फायद्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:55+5:302021-05-04T04:13:55+5:30
कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान ...
कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान पूर्वपदावर येण्यासाठी प्रत्येकानेच कोरोनाशी लढा देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे़ प्रत्येकाने या संकटातून बाहेर पडायचे आहे, असेल तर काही गोष्टी आपणाला कराव्या लागणार आहेत़ यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढणे अवश्यक आहे़.
कोरोना वाडी-वस्त्या, गावांमध्ये पोहोचला आहे़. पहिल्या टप्प्यामध्ये शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण होते़. आता तर ग्रामीण भागामध्येही संख्या वाढल्याने चिंतेची बाब बनली आहे़. गावाकडचा माणूस भोळाभाबडा, असे म्हटले जाते़. पहिल्या टप्प्याच्या वेळी गावकऱ्यांनी अनेक गावांमध्ये गावाच्या सीमा बंद केल्या होत्या़. त्यामुळे काही ठिकाणी याला विरोधही झाला होता़. त्यातच कोरोना रुग्ण सापडल्यास त्या गावच्या परिसराचा काही किलोमीटरपर्यंतचा भाग बंद करण्यात येत होता़. मात्र, आता ते दिवस राहिलेले नाहीत़. त्यामुळे आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे़. कारण कोरोनाचा प्रसार आता हवेतूनही होत असल्याने त्याचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही़. त्यामुळेच आज कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून ग्रामीण भागालाही विळखा घेतला आहे़. त्यातच मृतांची आकडेवारी दररोज वाढत असून ही बाब चिंताजनक आहे़. त्यामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त होत आहेत़. एकेका कुटुंबातील कमवती व्यक्ती तर काही कुटुंबातील दोन-दोन व्यक्ती कोरोनाचे बळी पडत असल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे़. या बळींमध्ये आता तरुणांची संख्याही वाढू लागल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे़. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: जपायला पाहिजे़ आधी जीव नंतरच सर्व काही, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे़.
कोरोनाचे वाढते संकट पाहाता शासनाने आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविले आहे. मात्र, निर्बंध अधिक कडकही करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी करावी. तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा बाबी केल्यास कोरोनाला दूर ठेवता येईल.
जिल्ह्यातील काही गावांनी स्वत:हून कडक लॉकडाऊन पाळण्याचे जाहीर केले आहे. मरण्यापेक्षा घरात बसलेले बरे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानेच गावांना स्वत:हून निर्णय घेण्याची वेळ आली आहे. याची जाणीव प्रत्येकाने स्वत:ला करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा फार गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
रहिम दलाल