साडेसहा वर्षे फरार आराेपी गुजरातमधून ताब्यात, रत्नागिरी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:35 PM2023-02-06T14:35:53+5:302023-02-06T14:36:20+5:30
पुढील कार्यवाहीसाठी खेड पाेलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी : खेड पाेलिस स्थानकाच्या हद्दीत गुन्हा करून साडेसहा वर्षे फरार आराेपीला रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरात येथे अटक केली. ही कारवाई शनिवारी (४ फेब्रुवारी) करण्यात आली. वसीम इम्तियाज शेख (३३, रा. काेकंबा आळी, दापाेली) असे त्याचे नाव आहे.
वसीम शेख याच्यावर खेड पाेलिस स्थानकात ४२०, ४०६ व ४२७ अन्वये २०१६मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून ताे ६ वर्षे ५ महिने नजरेआड झाला हाेता. पाेलिस त्याचा कसून शाेध घेत हाेते; मात्र त्याचा शाेध लागत नव्हता.
अखेर पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पाेलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. हे पथक वसीमच्या मागावर हाेते.
या पथकाला वसीम शेख याच्याबाबत गाेपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांचे पथक गुजरात येथे दाखल झाले. गुजरातमधील मुस्तंग नगर, उधना यार्ड सुरत येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील कार्यवाहीसाठी खेड पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पाेलिस फाैजदार प्रशांत बाेरकर, हेड काॅन्स्टेबल विजय आंबेकर, याेगेश नार्वेकर यांनी केली.