Ratnagiri: चिपळूणमध्ये एटीएसकडून सहाजण ताब्यात; अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:05 PM2024-10-10T12:05:09+5:302024-10-10T12:06:10+5:30
चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश ...
चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
सावर्डे विभागात दोन दिवस दहशतवादविरोधी पथक तळ ठोकून होते. या पथकाने सावर्डे बाजारपेठेलगतच्या एका विभागातून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत कर्नाटकमधील पाच जणांनाही चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर या कारवाईत हे पथक गुंतले होते. त्यानंतर बुधवारी सावर्डे येथील तरुण हाती लागताच हे पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, या पथकाने स्थानिक पोलिसांना या घटनेचा सुगावा लावून दिला नाही. त्यामुळे या प्रकाराविषयी स्थानिक पोलिसांना फारशी माहिती नाही.
संबंधित स्थानिक तरुणाने मुंबई येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असून तेथेच त्याची कर्नाटकमधील पाच जणांशी ओळख झाली असावी, अशी चर्चा आहे. याविषयी सावर्डे पोलिसांकडे अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध नसली, तरी संबंधित कारवाईला दुजोरा देण्यात येत आहे.