सिंधुुदुर्ग जिल्ह्याला सहा कांस्यपदके
By admin | Published: September 11, 2014 09:30 PM2014-09-11T21:30:07+5:302014-09-11T23:10:34+5:30
राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धा : निवड चाचणीतही ज्युदोपटूंची बाजी
कणकवली : महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्यावतीने उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ४२ व्या राज्यस्तरीय ज्युदो चॅम्पियन स्पर्धेत तसेच राष्ट्रीय निवड चाचणी सब ज्युनिअर स्पर्धेत सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील ज्युदोपटूंनी उज्ज्वल यश मिळविले. या स्पर्धेत सहा कांस्यपदकांची कमाई सिंधुदुर्गच्या संघाने केली आहे.
या स्पर्धेत राज्यभरातून ४५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १६ ज्युदोपटूंनी भाग घेतला होता. त्यापैकी २५ किलो वजनी गटात (१० ते १२ वर्षे वय ) तळेरे येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ ची विद्यार्थिनी साक्षी तळेकर, याच वजनी गटात मुलांमधून (१० ते ११ वर्षे वय) नीलेश राठोड, ३० किलो वजनी गटात (११ ते १२ वर्षे वयोगट) धनश्री जंगले, (१२ ते १३ वयोगट) रसिका राठोड, ४० किलो वजनी गटात (१४ ते १५ वर्षे) ऋचिता भागवत व मुलांच्या गटात अनिल जाधव (सर्व कासार्डे विद्यालय) यांनी कांस्यपदक मिळविले आहे.
तर आर्यन पवार, संध्या पटकारे, धनलक्ष्मी चव्हाण, दिव्यश्री मारकड, शिवानी लडगे, सोनू जाधव, दर्शन भोगले, साईप्रसाद बिजीतकर, बाळकृष्ण वरक व विठ्ठल राठोड या खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पदक विजेत्या खेळाडूंना उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, सचिव दत्ता आफळे, शैलेश टिळक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या यशस्वी खेळाडूंना जिल्हा मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, अभिजीत शेट्ये, सुरेश अंबुरे, दर्शना मारकड, केतन सावंत, प्राची खांडेकर, ओंकार अवसरे यांचे मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी, कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य पी. एस. पाटील, तळेरे नं. १ चे मुख्याध्यापक संजय कदम यांनी अभिनंदन केले
आहे. (वार्ताहर)