आंजर्ले समुद्रात सहाजण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 04:09 PM2020-12-18T16:09:12+5:302020-12-18T16:23:45+5:30
Dapoli : पुण्यातील औंधमधील एका कंपनीत काम करणारे १४ पर्यटक पर्यटनासाठी आंजर्ले येथे आले होते. गुरूवारी हे सर्वजण येथीलच एका रिसॉर्टवर उतरले होते.
दापोली : पाण्याचा अंदाज न आल्याने दापोलीतील आंजर्ले समुद्रकिनारी सहाजण बुडाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, तिघांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील औंधमधील आहेत. अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे असे मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पुण्यातील औंधमधील एका कंपनीत काम करणारे १४ पर्यटक पर्यटनासाठी आंजर्ले येथे आले होते. गुरूवारी हे सर्वजण येथीलच एका रिसॉर्टवर उतरले होते. शुक्रवारी सकाळी हे सर्वजण आंजर्ले समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. त्यातील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पालांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे अशी बुडणाऱ्या पर्यटकांची नाव आहेत. हे ६ जण पाण्यात ओढली गेली, त्यातील ३ जणांना स्थानिकांना वाचण्यात यश आले. मात्र, अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे या तिघांचा बुडून मृत्यू झाला.
समुद्रात पर्यटक बुडत असताना अभिनय केळसकर, नितेश देवकर, नीलेश गुहागरकर, तृशांत भाटकर,अभिजीत भाटकर, बाळा केळसकर,आवा मयेकर,दीपा आरेकर, पप्पू केळसकर या स्थानिकांनी वाचविण्यासाठी प्रयत्न केले.