सहा महिन्यांत डेंग्यूचे ६६ रुग्ण गतवर्षीपेक्षा रुग्णांच्या प्रमाणात घट
By admin | Published: November 3, 2014 11:06 PM2014-11-03T23:06:47+5:302014-11-03T23:32:11+5:30
घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़
रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात डेंग्यू तापाचे प्रमाण कमी आहे़ मागील सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले असून, सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही़
डेंग्यू हा एडीस इजिटी या डासांपासून होतो़ डेंग्यूकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो़ इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचे प्रमाण फार कमी आहे़ डेंग्यू ताप दोन प्रकारचा असतो़ तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, डोळे तीव्र दुखणे, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे
ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. शिवाय त्वचेखाली रक्तस्राव होणे, नाकातून रक्तस्राव होणे आणि रक्ताची उलटी होणे अशीही लक्षणे आढळून येतात़ जिल्ह्यात गतवर्षी या कालावधीत डेंग्यूचे ८९ रुग्ण आढळले होते़ त्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता़ त्यानंतर चालू आर्थिक वर्षात मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले आहेत़
डेंग्यूची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे़ कोरडा दिवस पाळणे, योग्य घनकचरा व्यवस्थापन, टायर-ट्यूबची वेळीच विल्हेवाट लावणे किंवा बंद अवस्थेत ठेवणे, डेंग्यूबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे़ (शहर वार्ताहर)
जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी डास नियंत्रण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे़ त्यासाठी घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़
- डॉ़ कॅप्टन बी़ जी़ टोणपे,
जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी़
डेंग्यू रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी
तालुकारुग्ण
दापोली१
खेड१
चिपळूण९
गुहागर१५
संगमेश्वर१४
रत्नागिरी२१
लांजा४
राजापूर१
एकूण६६