सहा गावांनी एकत्र येत उभारले विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:27+5:302021-06-22T04:21:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीतील सहा गावांनी एकत्र येऊन दादासाहेब सरफरे विद्यालय येथे कोरोना विलगीकरण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीतील सहा गावांनी एकत्र येऊन दादासाहेब सरफरे विद्यालय येथे कोरोना विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली.
यावेळी तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, उद्योजक संजय भाताडे, बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम गर्दे, सचिव शरद बाईत, संचालक सचिन मोहिते, संचालक दिनेश जाधव, मुचरी सरपंच विकास बेटकर, तेर्ये गावचे माजी सरपंच संदीप भुरवणे, अशोक साळवी, प्रवीण पवार उपस्थित होते.
शासनाने दोन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वस्तीकरिता गावात विलगीकरण कक्ष सुरु करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे शिवणे, करंबेळे, तेर्ये-बुरंबी, मुचरी, कोसुंब व लोवले हे सहा गावे विलगीकरण कक्षासाठी एकत्र आली आहेत. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या शेवटच्या मजल्यावर हे विलगीकरण केंद्र तयार केले आहे. संस्थेने इमारतीचा एक मजलाच उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य होत आहे. याठिकाणी पन्नास बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
आमदार निकम यांनी ग्रामस्थांच्या या एकजुटीचे कौतुक केले आणि लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली तसेच प्रशासनाकडूनही सहकार्य करण्यात येत आहे.
---------------------------
ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शन
काेराेनाबाधित ग्रामस्थांवर गावातच उपचार हाेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. सहा गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत विलगीकरण कक्षाची उभारणी केली. या कक्षाच्या उभारणीदरम्यान ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शनही दिसले. ग्रामस्थांच्या या एकजुटीला अनेकांची साथ मिळत आहे. उद्योजक संजय भाताडे यांनी बेड, गाद्या, उशा, ब्लॅंकेट आणि जेवणासाठीचे साहित्य असे सुमारे सहा लाख रुपये मदत स्वरुपात दिले आहेत.
---------------------------------------
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची आमदार शेखर निकम यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित हाेते.