रत्नागिरीत सहा विहिरी एका रात्रीत आटल्या, पाण्याचा खडखडाट
By मेहरून नाकाडे | Published: March 23, 2024 06:16 PM2024-03-23T18:16:17+5:302024-03-23T18:16:34+5:30
रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत ...
रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत चार ते साडेचार फूट पाण्याची पातळी असताना, शुक्रवारी (दि.२३) रोजी अचानक विहिरीमध्ये पाण्याचा खडखडात झाला. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२४) पाण्याचा खडखडाट कायम होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे पाण्याशिवाय हाल होणार असून भविष्यात शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
शहरातील शिवाजीनगर परिसरातील आसपासच्या सहा विहिरी एका रात्रीत आटल्या आहेत. गतवर्ष झालेला कमी पाऊस, शिवाय पाण्याचा मोठ्या प्रमाणावरील उपसा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यातच रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलही पाणीसाठा कमी झाल्याने शहरात सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू आहे. एप्रिलमध्ये शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच पाणी समस्या निर्माण झाली असताना त्यातच विहिरी आटल्यामुळे परिसरातील नागरिकांना भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या परिसरात असलेल्या पाणी व्यवसायिकांचाही व्यवसाय संकटात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथील विहिरींमध्ये मुबलक पाणी होते, परंतु शुक्रवारी सकाळी विहीरींचे पंप सुरू करण्यासाठी नागरिक गेल्यानंतर खडखडाट झाल्याचे लक्षात आले. ही गोष्ट शहरात पसरताच कोरड्या झालेल्या विहिरी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली. पाण्याचा अति उपसा व वाढता उष्मा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात घट झाली असल्याचा अंदाज भूजल विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विहिरींमधील पाण्याचे नमूने, पाणीपातळी घेण्यात आली आहे. परंतु कोणत्याही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीपातळीत घट झालेल्या अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील परिसरात असलेल्या विहिरींच्या पातळीत मात्र घट का झाली याचे स्वतंत्रपणे संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
शिवाजीनगर या भागात पाण्याचा स्त्रोत चांगला असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी व्यवसायिकांच्या विहिरी या परिसरात आहेत. बहुतांश शहराला याच भागातील व्यावसायिक पाणी पुरवठा करतात. गुरूवार (दि.२२) पर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित असताना, अचानक झालेल्या खडखडाटामुळे पाणी व्यवसाय धोक्यात आला, शिवाय नागरिकांचेही हाल होणार आहेत.
गेली ३२ वर्ष शिवाजीनगर परिसरात पाणीपुरवठा व्यवसायिक म्हणून कार्यरत आहेत. जून महिना संपला तरी आमच्या विहिरीचे पाणी कधी आटत नव्हते. मात्र यावर्षी अचानक पाणी कमी झाले व विहिरीत खडखडाट झाला. त्यामुळे पाणी व्यवसाय बंद करावा लागला आहे. - कुंदन सावंत, पाणी पुरवठा व्यावसायिक