सोळजाई संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:32 AM2021-04-09T04:32:46+5:302021-04-09T04:32:46+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवळी येथे श्री देवी वाघजाई क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पंचक्रोशी तसेच निमंत्रित कबड्डी ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवळी येथे श्री देवी वाघजाई क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पंचक्रोशी तसेच निमंत्रित कबड्डी संघाच्या स्पर्धेत सोळजाई परशुराम वाडी संघाने विजय संपादन केला आहे. सोळा संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.
वेतन फरक मिळणार
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुसूत्रीकरण प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या शिक्षण, अनुभव व समान पदानुसार वेतन आयोजित सुसूत्रता आणावी अशी मागणी केली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे.
वणव्यामुळे जंगल खाक
खेड : मुरडे - चाकाळे येथील सीमावाडी येथे लागलेल्या वणव्याने झाडे जळून खाक झाली आहेत. वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. मात्र, वणव्यामुळे जवळची जंगली झाडे जळून खाक झाली आहेत. वणव्याचे कारण नेमके समजू शकले नाही.
रस्ता दुरुस्तीची मागणी
आरवली : मुंबई - गोवा महामार्गाला जोडणाऱ्या तुरळ, सरंदमार्गे माखजन रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्ता दुुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून करण्यात येत आहे. माखजन खाडीपट्टा हा संगमेश्वर तालुक्याला जोडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ सातत्याने सुरू असते.
त्रैवार्षिक उत्सव साधेपणाने
मंडणगड : तालुक्यातील मुबीज गावातील श्री साळुबाई देवीचा त्रैवार्षिक उत्सव कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करीत साधेपणाने साजरा करण्यात आला. आयोजकांनी केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिल्याने गर्दी झाली नाही. मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले.
रस्ता दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : विमानतळापासून वेतोशीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे अंतरिम संयोजक ज्योती प्रभा पाटील यांनी केले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.
धोंडे यांच्याकडे कार्यभार
दापोली : दापोली पोलीस उपनिरीक्षकपदी मोहन धोंडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. मूळचे अहमदनगर येथील ते असून गेली साडेचार वर्षे पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. जिल्हा विशेष शाखेत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काही वर्षे काम केले आहे.