लोटेत सहावा स्फोट; सुदैवाने कोणी जखमी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:44+5:302021-04-30T04:39:44+5:30
आवाशी : गेल्या चार महिन्यांतील स्फोट आणि आगीच्या सहाव्या घटनेने लोटे परिसर पुन्हा एकदा हादरला. बुधवारी सकाळी अकरा वाजता ...
आवाशी : गेल्या चार महिन्यांतील स्फोट आणि आगीच्या सहाव्या घटनेने लोटे परिसर पुन्हा एकदा हादरला. बुधवारी सकाळी अकरा वाजता लोटे - परशुराम (ता. खेड) येथील एमआर स्पेशालिटी केमिकल्स प्रा. लि. या कंपनीत स्फोट होऊन आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी पंचक्रोशी पुन्हा एकदा भयभीत आहे.
गेली अनेक वर्षे येथे कार्यरत असलेली एमआर स्पेशालिटी प्रा. लि. ही कंपनी एफबीडी या मटेरियलचे उत्पादन घेते. याच मटेरियलचे मिश्रण करण्याचे काम सुरू असतानाच मटेरियलने पेट घेतला. थोडक्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग मोठ्या प्रमाणावर वाढत जाऊन संपूर्ण प्लॅन्टमध्ये आगीने प्रवेश केला. चारही बाजूंनी बंद असणाऱ्या या बिल्डींगमधून आगीला बाहेर जाण्यास वाव न मिळाल्याने आग कोंडली गेली. त्यामुळे स्फोट होऊन शेडवरील पत्रे उडाले.
स्फोटाच्या आवाजामुळे असंख्य लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनी आवाराबाहेर धाव घेतली. यावेळी कंपनीत दोन महिला कर्मचाऱ्यांसह एकूण एकवीस कामगार काम करत होते. ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथे तीन कामगार उपस्थित होते. मात्र कुणाला काहीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले.
घटना घडताच लोटे औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने खेड नगरपरिषदेचा अग्निशमन वाहनही दाखल झाले. आग लागताच घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक ग्रामस्थांमधील मनोहर कालेकर, नाना चाळके, आवाशी सरपंच अॅड. राज आंब्रे, उपसरपंच अमित आंब्रे, सदस्य संदेश शिगवण, आवाशीचे ग्रामस्थ सुदेश आंब्रे, सतीश आंब्रे, अजिंक्य आंब्रे, सुभाष आंब्रे, सखाराम गोरे, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके व अन्य लोटे, घाणेखुंट, तलारीवाडी, पिरलोटे, गुणदे, असगणीचे संदीप फडकले व अन्यजणांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.
.............
मटेरियलच्या साठ्याचा अडथळा
रविवार दि. १८ रोजी येथील समर्थ इंजिनिअरिंग कंपनीत झालेल्या स्फोटानंतर अग्निशमन दल लगेचच दाखल झाले. मात्र कंपनी आवारात सगळीकडेच मटेरियल भरून ठेवलेल्या ड्रममुळे घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण येत होता. त्यामुळे कंपनीत अडकलेल्या तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. अन्य जखमींनाही बाहेर काढण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागले. तशीच अवस्था एमआर स्पेशालिटी कंपनीतही निदर्शनास आली. कंपनी प्रवेशद्वारापासूनच प्लॅन्टपर्यंत असणाऱ्या रस्त्यावरच एकावर एक रचून ठेवलेले ड्रम अग्निशमन वाहनांसाठी अडथळा ठरले. त्यामुळेच आग आटोक्यात आणण्यासाठी एक तासाहून अधिक काळ झुंज द्यावी लागली. औद्योगिक सुरक्षा निरीक्षकांनी पाहणी करताना या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा, अशी मागणी मदत करणाऱ्यांकडून केली जात आहे.