खास प्रवाशांच्या आग्रहास्तव रत्नागिरी- पुणे मार्गावर स्लिपर कोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:41 PM2018-05-12T15:41:07+5:302018-05-12T15:41:07+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत.
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत. महाराष्ट्र दिनापासून रत्नागिरी - मुंबई मार्गावर शिवशाही स्लीपर कोच बस धावत असताना खास प्रवाशांच्या आग्रहास्तव रत्नागिरी - पुणे निगडीे मार्गावर ९ मेपासून शिवशाही स्लीपर कोच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या असून, रत्नागिरी आगारात ६, दापोली आगारात १३, खेडमध्ये ३, चिपळुणात ५, गुहागर आगारात ४ आणि राजापूर आगारात २ बसेस आहेत. सर्वात जास्त शिवशाही गाड्या दापोली आगारात आहेत. शिवशाही गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच प्रवाशांच्या मागणीनुसार रत्नागिरी विभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी - मुंबई सेंट्रल मार्गावर स्लीपर कोच सुरू केली.
प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर व आग्रहास्तव रत्नागिरी - पुणे - निगडी मार्गावर रात्री १० वाजता शिवशाही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे तिकीट ७८० रूपये आहे. निगडीहून ही गाडी रात्री ९ वाजता सुटणार आहे.
एलईडी स्क्रीन
संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या अद्ययावत बसची आसनक्षमता ४५ इतकी आहे. या बससाठी संगणकीय आरक्षण उपलब्ध आहे. प्रवाशांना झोपण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रत्येक आसनासमोर एलईडी स्क्रीन आहे.