एसएमएस फंडा अनेकांना गंडा
By admin | Published: August 27, 2014 10:19 PM2014-08-27T22:19:49+5:302014-08-27T23:13:34+5:30
चिपळुणातील प्रकार : महिलांचीही फसवणूक
चिपळूण : तुम्हाला २५ लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, त्यासाठी १५ हजार रुपये भरा, असा एसएमएस येण्याचा प्रकार चिपळूणमध्ये सुरु आहे. मोबाईलद्वारे काही महिलांची फसवणूक झाली असल्याची चर्चा असून, अशा घटनांपासून नागरिकांनी सावध राहायला हवे, असे आवाहन माजी नगरसेविका सीमा चाळके यांनी केले आहे.
सध्या मोबाईलचे युग असल्याने तरुण-तरुणींसह अनेकांच्या हातात सध्या मोबाईल पाहायला मिळतो. बँकेतील खातीही इंटरनेटशी जोडली गेली असल्याने खाते क्रमांक सांगून ग्राहकांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. याचा अनुभव प्रत्यक्ष माजी नगरसेवक चाळके यांना आल्याचे त्यांनी सांगितले.
तामिळनाडू येथून एक आपल्याला मोबाईलवरुन एसएमएस आला. आपल्याला २५ लाखांचे बक्षीस लागले आहे. त्यासाठी दिलेल्या खाते क्रमांकावर १५ हजार रुपये भरा, अशी सूचना करुन ३ तासाने तुमची भरलेली रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखविले जात आहे. गोवळकोटसारख्या भागातही अशा प्रकारे ३ ते ४ महिलांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. तामिळनाडू येथील एका टोळीकडून नागरिकांना आपल्या बँकेचा अकाऊंट नंबर सांगा. आम्ही बँकेतून बोलत आहोत, असे सांगून बँक खात्यातील पैसे परस्पर गायब होण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने याबाबत चाळके यांनी पोलीस यंत्रणेकडेही संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला आहे, असे चाळके यांनी सांगितले.
आपल्याला मोठे बक्षिस लागले आहे, असे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार होण्याची शक्यता असल्याने यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही चाळके यांनी केले आहे. (वार्ताहर)