Ratnagiri: दापोलीत खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक
By मनोज मुळ्ये | Published: August 11, 2023 05:45 PM2023-08-11T17:45:50+5:302023-08-11T17:46:46+5:30
कारवाईत ११.६७८ किलाे ग्रॅम वजनाची खवले जप्त
दापाेली : दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीतील साेंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे. ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विराेधी शाखा आणि दापाेली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी १:४० वाजता केली. बाळा गणपत लोंढे (८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील व पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर दापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला.
या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हा सोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवले तस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला. या कारवाईत ११.६७८ किलाे ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई दहशतवाद विराेधी शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळराव, उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, सुरक्षा शाखेचे सहायक पाेलिस फाैजदार प्रशांत बोरकर, पाेलिस हवालदार ओंकार सावंत, वन रक्षक गणपती जळणे यांनी केली.