तर शिवसेनाही रसातळाला जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:59+5:302021-07-07T04:38:59+5:30
उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांनी दिला इशारा लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे लक्ष नाही. शिवसैनिक जगला काय ...
उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांनी दिला इशारा
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे लक्ष नाही. शिवसैनिक जगला काय आणि मेला काय याचे कोणालाच देणेघेणे नाही. वरिष्ठ नेत्यांची जर अशीच भूमिका राहिली, तर शिल्लक असणारी शिवसेनाही ही रसातळाला जाईल. पुन्हा उभी राहणेही कठीण आहे. या साऱ्याला सेनेचे वरिष्ठ नेतेच जबाबदार असल्याचा घणाघात आणि घरचा आहेर ज्येष्ठ शिवसैनिक व उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांनी दिला आहे.
चिपळूण शिवसेनेत मरगळ आली आहे. नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ना संघटनेचे ना शिवसैनिकांचे देणेघेणे राहिले आहे. अंतर्गत वाद नुकतेच उघड झाले आहेत. संघटनेची वाटचाल पूर्ण थंडावली आहे. या साऱ्या गोष्टी सहन न झाल्याने आणि शिवसेना चिपळूणमध्ये उभे करणारे माजी सभापती, ज्येष्ठ शिवसैनिक आणि उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांनी शिवसैनिकांमधील खदखद खुलेआम व्यक्त करून सेनेच्या नेत्यांवर तोफ डागत घरचा आहेर दिला आहे.
याविषयी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दहा वर्षानंतर विधानसभेला पराभव झाला. मात्र त्यानंतर त्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली का? आम्ही उपाशी पोटी रात्रीचा दिवस करून संघटना उभी केलेली आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याची माहिती आहे. आज शिवसेनेची अवस्था बघा काय आहे. शिवसैनिक निराशेच्या गर्तेत आहे. कोणाचा कोणाला पायपोस राहिला नाही आणि नेत्यांना त्याची गरजही वाटत नाही, असा घणाघाती आरोप चाळके यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
चिपळूण शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिकांना आता किंमत राहिलेली नाही. निष्ठेच्या नावाखाली शिवसैनिक काम करतील, असा भ्रम झाला आहे. मात्र शिवसैनिक आता या साऱ्यांचे खेळ बघून घेत आहे. कोणाच्या निष्ठा कुठे आणि कशासाठी आहेत, हे आता ओळखले आहे. शिवसैनिक योग्य जागा दाखवेल, मात्र त्यामध्ये शिवसेनेचे नुकसान होणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख चाळके म्हणाले. मी नेत्यांना सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण आम्ही लोकांनी भोगले आणि सोसले आहे. मात्र याची दखल न घेतल्यास मी या विरोधात उठाव करेन. मग जे घडेल ते बघावे लागेल, असा इशाराही उपजिल्हाप्रमुख चाळके यांनी दिला आहे.