..म्हणून वीज तोडली, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:53 PM2022-04-18T18:53:35+5:302022-04-18T18:54:52+5:30
अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले.
गणपतीपुळे : आंबा पीक शेती प्रकारात येत नसून हाॅर्टिकल्चर प्रकारात येते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार वीज ताेडल्याचे उत्तर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले.
गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गणपतीपुळे येथे आढावा बैठक आयाेजित केली हाेती. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आंबा बागायतदार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन ताेडल्याची माहिती मंत्री सामंत यांना कळताच त्यांनी सभेतच कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. शासन निर्णय शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडायची नसतानाही ही वीज कनेक्शन का तोडण्यात आली? असा प्रश्न त्यांनी केला.
या प्रश्नाला उत्तर देताना कार्यकारी अभियंता यांनी आंबा पीक हे शेती प्रकारात येत नसून ते हाॅर्टिकल्चर प्रकारात येते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ही वीज तोडल्याचे उत्तर दिले. त्यावर कोकणातील आंबा पीक हे शेती प्रकारात येत नाही हा जावईशोध कसा लावला? अशी विचारणा मंत्री सामंत यांनी केली.
त्यानंतर त्यांनी तत्काळ राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी तोडलेली वीज कनेक्शन आजच्या आज जोडून देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांना दिले. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतःचे विचार अंमलात न आणता शासनाची भूमिका बजवावी, अशी समजही दिली.