.. तर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, मंत्री उदय सामंतांचे सूचक विधान
By मनोज मुळ्ये | Published: January 11, 2024 02:53 PM2024-01-11T14:53:58+5:302024-01-11T14:54:26+5:30
रत्नागिरी : विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निर्णय अतिशय चांगला होता. मात्र त्यांनी शिवसेनेच्या 13 आमदारांना अपात्र का केले नाही, ...
रत्नागिरी : विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निर्णय अतिशय चांगला होता. मात्र त्यांनी शिवसेनेच्या 13 आमदारांना अपात्र का केले नाही, हा आमच्या समोर प्रश्न आहे. त्या आमदारांना अपात्र करावे, या मागणीसाठी आम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे सूचक विधान राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. जर ठाकरे शिवसेना या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते तर ठाकरे शिवसेनेतील 13 आमदारांना अपात्र करण्याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची कुठलीही पद्धतीने दखल घेण्याची आपल्याला गरज वाटत नाही असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राम मंदिर उद्घाटनाला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसचा आधीपासूनच राम मंदिराला विरोध होता. आता अशा लोकांबरोबर राहणाऱ्यांनी आपल्या भूमिका ठरवायला हव्यात, असा टोला त्यांनी ठाकरे शिवसेनेला हाणला.