आर्थिक स्वावलंबनाबरोबरच सामाजिक भान

By admin | Published: December 4, 2014 10:42 PM2014-12-04T22:42:00+5:302014-12-04T23:42:50+5:30

एकजुटीतून विकासाला दिशा : एकता स्वयंसहायता महिला बचत गट, कर्ला

Social consciousness along with financial autonomy | आर्थिक स्वावलंबनाबरोबरच सामाजिक भान

आर्थिक स्वावलंबनाबरोबरच सामाजिक भान

Next

पूर्वी केवळ ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतेच महिलांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. मात्र, आता तिच्या कार्यकक्षा रूंदावल्या आहेत. अर्थार्जनाची गरज पुरूषांइतकीच स्त्रियांनाही वाटू लागली आहे. त्यामुळे महिला एकत्र येण्यातून आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ मिळू लागले आहे. महिलांनी एकत्र येऊन उभारलेल्या बचत गटांनी कुटुंबाच्या आर्थिक सक्षमतेला हातभार लावला आहे. पण, याचबरोबर गावच्या विकासातही योगदान दिले आहे. आज असे अनेक बचत गट पुढे आले आहेत. यापैकी एक महिला बचत गट म्हणजे रत्नागिरी नजीकच्या कर्ला येथील एकता स्वयंसहायता महिला बचत गट.
सामाजिक बांधिलकीतून काहीतरी काम करायला हवे. आर्थिक सक्षमीकरणासाठीही काहीतरी करायला हवे, या तळमळीतून कर्ला येथील महिलांनी १६ सप्टेंबर २००६ साली ‘एकता स्वयंसहायता बचत गटा’ची स्थापना केली. सुरूवातीला या बचत गटांमध्ये १४ महिला सदस्यांचा सहभाग होता. सुरूवातीला या बचत गटाला यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा चांगलाच लाभ महिलांना सदस्यांना झाला. प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्ष प्राची शिंदे यांचे मार्गदर्शन सातत्याने बचत गटाला मिळत गेले. दरवर्षी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले जाते. त्यात महिलांचा नेहमीच सहभाग असतो. बचत गट नव्याने स्थापन झाला. त्यावेळी भाट्ये येथे पहिल्यांदाच आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात या गटाने सहभाग दर्शविला. यात त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. बचत गटाच्या सर्व महिला कार्यशील आहेत. सर्वच वयोगटातील असलेल्या या महिला गृहिणीपद सांभाळूनच बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकास चळवळ पुढे नेत आहेत. सुरूवातीला सर्व सदस्यांना सहजशक्य व्हावे, या उद्देशाने ५० रूपये इतकी मासिक वर्गणी काढली जात होती. मात्र, आता ती १०० रूपये करण्यात आली आहे. सदस्यांना येणारी आर्थिक अडचण लक्षात घेऊन आता या बचत गटाने अंतर्गत कर्जवाटपही सुरू केले आहे. हा बचत गट अगदी २५ हजार रुपयांपर्यंत अंतर्गत कर्ज देऊ शकतो. आर्थिक सहायाबरोबरच गावातील स्वच्छता, आरोग्य आदींबाबत जागृती करण्यासाठीही या महिला धडपडत आहेत. कर्ला गावात स्वच्छता निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा तेथे प्लास्टिक निर्मुलन होण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन महिलांनी घरोघरी जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. काही दिवस यश आले. मात्र, पूर्णत: यश येण्यासाठी तेथील लोकांची मानसिकता बदलायला हवी, यासाठी आता हा बचत गट वेगळा उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नात आहे. या बचत गटाने योगासनांची अनेक शिबिरे आयोजित केला आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमातही महिलांचा सहभाग असतो. या महिलांनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम तयार करून तो इतर ठिकाणीही सादर केला. पालखी नृत्यासारख्या लोककलांची तसेच सर्व सणांची माहिती व्हावी, हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता. काही महिला सदस्या भजन मंडळातही सहभागी होतात. बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन काही महिला ज्वेलरी तयार करणे, कपडे तयार करणे, कडधान्ये विकणे यांसारखे घरगुती व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. एका सदस्याने तर यातून प्रेरणा घेऊन गटाकडून कर्जाचे सहाय घेत पीठगिरणीचा व्यवसाय सुरू केला.
आज या महिला आपल्या बचत गटाचे नाव सार्थ करतानाच आपण सामाजिक बांधिलकीतून काम करत आहोत, याचे समाधान आहे. स्थापनेपासून आतापर्यंत सर्व महिला एकविचाराने पुढे जात गावच्या विकासातही योगदान देत आहेत.
- शोभना कांबळे


गावाच्या विकासासाठीही अव्याहत धडपड...
सध्या एकता स्वयंसहायता महिला बचत गटात सायली नागवेकर, मेधा लिमये, रश्मी लिमये, संपदा नांदगावकर, स्वाती सोनार, पूजा मजगावकर, आरती नांदगावकर, सुवर्णा नांदगावकर, ज्योत्स्ना सोहनी, चैत्राली चव्हाण, तृप्ती नांदगाव या सदस्या आहेत. काही वर्षांपूर्वी या महिलांनी कर्ला मारूती देऊळ ते बसस्टॉपपर्यंतच्या रस्त्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांना गावात आणून त्यांच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करायला लावले. सध्या निवखोल घाटी येथील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठीही प्रसत्न करीत आहेत. यासाठी संबंधित विभागाला दोनदा निवेदने दिली आहेत. मात्र, त्याची अद्याप दखल घेतलेली नाहीत. त्यामुळे आता वेळ पडली तर आपण आंदोलनही उभारू, त्यादृष्टीने तयारीही या महिला सदस्यांनी केली आहे.


गावाच्या विकासासाठीही अव्याहत धडपड...
सध्या एकता स्वयंसहायता महिला बचत गटात सायली नागवेकर, मेधा लिमये, रश्मी लिमये, संपदा नांदगावकर, स्वाती सोनार, पूजा मजगावकर, आरती नांदगावकर, सुवर्णा नांदगावकर, ज्योत्स्ना सोहनी, चैत्राली चव्हाण, तृप्ती नांदगाव या सदस्या आहेत. काही वर्षांपूर्वी या महिलांनी कर्ला मारूती देऊळ ते बसस्टॉपपर्यंतच्या रस्त्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांना गावात आणून त्यांच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करायला लावले. सध्या निवखोल घाटी येथील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठीही प्रसत्न करीत आहेत. यासाठी संबंधित विभागाला दोनदा निवेदने दिली आहेत. मात्र, त्याची अद्याप दखल घेतलेली नाहीत. त्यामुळे आता वेळ पडली तर आपण आंदोलनही उभारू, त्यादृष्टीने तयारीही या महिला सदस्यांनी केली आहे.

Web Title: Social consciousness along with financial autonomy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.