समाजोपयोगी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:46+5:302021-05-14T04:30:46+5:30
गुहागर : ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेल्या कोरोना रुग्णांचे नातेवाईक यांनी आराेग्य कर्मचारी यांना दररोज रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी ...
गुहागर : ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेल्या कोरोना रुग्णांचे नातेवाईक यांनी आराेग्य कर्मचारी यांना दररोज रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी अध्यक्ष आणि हाॅटेल व्यावसायिक राजेश शेटे यांच्या वतीने मोफत जेवणाची साेय करण्यात आली आहे. त्यामुळे या लोकांची सोय झाल्याने धन्यवाद देण्यात येत आहेत.
कांदे, बटाटे दर उतरला
रत्नागिरी : सध्या भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेपर्यंत सुरू ठेवली जात आहेत. सध्या म्हणावा तसा भाजीपाल्याचा तसेच कांदे - बटाटे यांचा उठाव होत नसल्याने रस्त्यावरील विक्रेते कमी दराने विक्री करू लागले आहेत. मालाला उठाव नसल्याने वाया जात असून, नुकसान होत आहे.
मुंबईकरांना गावाची प्रतीक्षा
मंडणगड : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्या आनुषंगाने सुरू झालेले लाॅकडाऊन यामुळे चाकरमानी सध्या मुंबईतच अडकले आहेत. मुंबईत कोरोना वाढला असल्याने सध्या बाहेरही पडता येत नसल्याने काही चाकरमान्यांना गावांत येऊन तसेच मुंबईत राहूनही यावर्षी आंबे-फणसाचा स्वाद घेता येत नाही. त्यामुळे कधी गावी जातोय, असे झाले आहे.
पर्यटनस्थळांना पर्यटकांची प्रतीक्षा
गुहागर : मे महिना म्हणजे पर्यटनाचा महत्त्वाचा महिना असूनही यावर्षी कोरोनामुळे तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांच्या परिसरात शुकशुकाट पसरला आहे. त्याचबरोबर पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवसायही लाॅकडाऊनमुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मुले उकाड्याला वैतागली
रत्नागिरी : कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे लहान मुले यांना पालक घराबाहेर पाठवित नाहीत. त्यामुळे ही बालके आधीच कंटाळलेली आहेत. त्यातच वाढत्या उष्म्यामुळे घरात कमालीचा उकाडा होत असल्याने ती अधिकच त्रस्त झाली आहेत. अनेक बालकांना घामोळ्यासारखे त्वचेचे विकार त्रास देत आहेत.
पाणीटंचाई तीव्र
राजापूर : अनेक दुर्गम भागांना मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. आता मे महिना सुरू झाल्याने उष्मा वाढला आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटून गेले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच अनेक गावांमध्ये पाळीव जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे
डांबरीकरण कामाचा शुभारंभ
राजापूर : शहरातील भटाळी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत आणि रमेश गुणे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. नगरोत्थानमधून १३ लाख रुपयांचा निधी नगर परिषदेतील शिवसेना गटाने मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आता लवकरच हे काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे.
मान्सूनपूर्व कामांची चिंता
खेड : सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने अनेक ग्रामीण भागांमध्ये कामे करणारी माणसे सध्या मिळत नसल्याने घरे, गोठे दुरुस्तीची कामे खाेळंबली आहेत. तसेच शेतीची मान्सूनपूर्व कामेही थांबली आहेत. सध्या कृषी विषयक सेवा देणारी दुकाने केवळ ७ ते ११ या वेळेत सुरू असल्याने दुर्गम भागातील शेतकऱ्यांना ही वेळ साधणे शक्य होत नाही. त्यामुळे ही कामे करायची कधी, ही चिंता वाढली आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा
मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात गेला महिनाभर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या रुग्णालयात ३० बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी दहा बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सध्या रुग्ण गंभीर हाेण्याचे प्रमाण वाढल्याने हे बेड अपुरे पडत आहेत.
खेडशीत जनता कर्फ्यू
रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी गावात १३ ते १७ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने लाॅकडाऊनची अधिक कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केला जाणार आहे.