महामार्गावरील माती पावसाळ्यात ठरणार डाेकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:58+5:302021-05-30T04:24:58+5:30
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे़ मात्र, ताैक्ते वादळानंतर पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर येणारे पाणी ...
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे़ मात्र, ताैक्ते वादळानंतर पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर येणारे पाणी आणि चिखल याचे कोणतेच नियोजन केले नसल्याने पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल, माती आणि पाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महामार्ग चौपदरीकरणाचा मूळ ठेकेदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आरवली ते वाकेड हे काम मुंबईतील एमईपी कंपनीला देण्यात आले आहे़ एमईपीने नियमबाह्य काम जे.एम. म्हात्रे कंपनीला दिले आहे़ हे काम सुरू करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत़ पहिल्याच पावसात महामार्गाची दुरवस्था झाल्याने पुढे काय हाेणार, याची चिंता पडली आहे़
मुंबई-गोवा महामार्ग आरवली ते वाकेडदरम्यान ९१ किलोमीटरमधील चौपदरीकरणाचे काम करत असताना काही ठिकाणी पाइप कलव्हर्ट, छोटे पूल, मोठे पूल आणि डोंगराची माती यामध्ये कामाचे नियोजन ढिसाळ असल्याचे दिसत आहे़ पाइप कलव्हर्ट आणि पुलांच्या कामासाठी केलेल्या खोदकामामुळे पावसाळ्यात प्रवाशांच्या प्रवासाला धोका निर्माण झाला आहे़ तर, डोंगराचा भाग खोदून केलेल्या कामाची माती रस्त्यावर आल्याने महामार्ग निसरडा होण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे अपघात घडण्याची स्थिती निर्माण होत आहे़
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले म्हणून संतोष येडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कामाची पावसामुळे झालेली दुरवस्था पाहता आणि संभाव्य अपघात लक्षात घेऊन ही बाब आपण उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे याचिकाकर्ते संतोष येडगे यांनी सांगितले आहे.