आठ पिढ्यांचे सोळकोबा आणि बाळकोबा

By admin | Published: August 28, 2014 10:03 PM2014-08-28T22:03:50+5:302014-08-28T22:20:48+5:30

रत्नागिरीचे महाराजे : मांडवीचे नव्हे; अख्ख्या जिल्ह्यातील गणेशभक्तांसाठी आकर्षण

Sokalka and Babakoba of eight generations | आठ पिढ्यांचे सोळकोबा आणि बाळकोबा

आठ पिढ्यांचे सोळकोबा आणि बाळकोबा

Next

उमेश पाटणकर -रत्नागिरी -एक दोन नव्हे; तब्बल अडीचशे घराण्यांचे आणि त्यांच्या आठव्या पिढीचे आराध्य दैवत ‘सोळकोबा-बाळकोबा’ गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या (शुक्रवार) सकाळी मांडवी येथे विराजमान होत आहेत. शिवलकर बंधूंचा हा खासगी उत्सव असला तरी स्थापनेपासून विसर्जनापर्यंत संपूर्ण मांडवी गाव त्यांच्या उत्सवात सहभागी होत असल्याने त्यांच्यासाठी हा उत्सव सार्वजनिकच झाला आहे.
रत्नागिरी शहराचे अखेरचे टोक म्हणजे मांडवी. स्वतंत्र महसूली गाव म्हणून नोंद असलेल्या या गावात गणेशोत्सवात केवळ चौपाटी आहे म्हणून फिरायला जाणारे लोक ‘सोळकोबा-बाळकोबा’ ही नावे ऐकून या गणेशाच्या दर्शनाला जातात. वरचीवाडी, पिंपळवाडी, भैरववाडी, मायनाकवाडी आणि सदानंदवाडी अशा पाच वाड्यांच्या या गावात प्रतीश शिवलकर यांच्या निवासस्थानी ‘सोळकोबा’, तर राजेश शिवलकर यांच्याकडे ‘बाळकोबा’ विराजमान होतात. पूर्णत: हाती केलेले काम आणि १०० टक्के शाडू यांच्या वापरातून या दोन्ही मृर्ती घडवल्या जातात. शाडूच्या आधाराला काथ्याचा वापर केला जातो.
शिवलकर घरण्याचे आठवे वारसदार असलेले प्रतीश यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सोळा पोती शाडू वापरून घडणारी ही मूर्ती म्हणजेच ‘सोळकोबा’ तब्बल एक टनापेक्षा जास्त वजनाचा असायचा. यावर्षी वजन कमी करण्याच्या दृष्टीने १४ पोती शाडू वापरली असली तरी मूर्तीची उंची एकही इंच कमी झालेली नाही. वजन कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही केलेला हा प्रयत्न आम्हाला किती लाभदायक ठरतो, हे पाहावे लागेल. आषाढी एकादशीपासून विधिवत मातीपूजन, चौरंग पूजन करून कामाला सुरुवात करतो, असे ‘बाळकोबा’चे मूर्तिकार राजेश शिवलकर यांनी सांगितले. बारा पोत्यांचा ‘बाळकोबा’ यावर्षी दहा पोती शाडू वापरून बनवल्याचे सांगितले. राम आळीतील कै. बाबूराव पाटणकर यांच्यासह त्यांच्या तीन पिढ्या या मूर्ती करत असत. त्यानंतर पुंडलिक मोतीराम शिवलकर यांनी ३० वर्षे, अनिष दिवाकर शिवलकर यांनी आठ वर्षे, तर स्वत: राजेश गेली २८ वर्षे ही मूर्ती बनवित आहेत. प्रसिध्द मूर्तिकार घन:श्याम भाटकर यांनीही सोळकोबा-बाळकोबाच्या मूर्ती घडवल्या आहेत. सोळकोबाची मूर्ती गेली दहा वर्षे अमित शिवलकर घडवित आहेत. राजेश शिवलकर यांनी दोन्ही मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणून शासकीय परिभाषेतील ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती असा उल्लेख केला. कारण शाडूप्रमाणेच रंगकामासाठी ही केवळ जलरंगच वापरले जातात, असे सांगितले. मांडवी गावात गणेशोत्सवाची सुरुवात बाळकोबा- सोळकोबा यांच्या प्रतिष्ठापनेपासून होते. शहरातील अनेकजण बाळकोबा विराजमान झाल्याशिवाय आपला गणपती प्रतिष्ठापित करीत नाहीत. बाळकोबाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वेदमूर्ती चिंतुकाका जोशी आवर्जून उपस्थित असतात. त्यांची ही सातवी पिढी आजही श्रींच्या सेवेत आहे.
सोळकोबा - बाळकोबाचे विसर्जन गौरी विसर्जनाच्या दिवशीच केले जाते. खांद्यावरून विसर्जनासाठी मांडवीचे नव्हे रत्नागिरीचे महाराजे निघाल्याची वर्दी पोलिसांना मिळताच मांडवी नाक्यापासून जेटीपर्यंतचा रस्ता जास्तीत जास्त मोकळा राहील, याची काळजी पोलीस घेत असतात.

Web Title: Sokalka and Babakoba of eight generations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.