मांडवीतील सौरदीपस्तंभ रखडला...
By admin | Published: December 4, 2014 10:39 PM2014-12-04T22:39:14+5:302014-12-04T23:37:51+5:30
सुरक्षितता लांबणीवर : ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे स्तंभाचे काम अपूर्ण
रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे वैभव असलेल्या मांडवी बंदर जेटीजवळ समुद्रात मच्छिमार नौकांसाठी रात्रीच्या वेळी मार्गदर्शक ठरेल, असा सोलर दीपस्तंभ उभारला जात आहे. मात्र, सहा महिन्यात जे काम पूर्ण करायचे होते ते वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी रखडले आहे. हे सहा महिन्यांचे काम पूर्ण होण्यास सहा वर्षांचा कालावधी लागणार काय, असा संतप्त सवाल आता रत्नागिरीकरांतून केला जात आहे.
रत्नागिरी शहरात किल्ला भागात दीपगृह आहे. त्याचा मच्छिमारी नौकांना रात्रीच्या वेळी नौका योग्य मार्गाने आणण्यासाठी उपयोग होतो. मात्र, मांडवी बंदर जेटीजवळील समुद्रात ठिकठिकाणी खडकाळ भाग असून, भरतीच्या वेळी हे खडक मच्छिमारी नौकांना समजत नसल्याने मांडवी जेटी समुद्रात ज्या खोल भागापर्यंत आहे, त्यापुढे डावीकडील भागात सागरी पाण्यातच हा दीपस्तंभाचा कॉँक्रिट खांब उभारला जात आहे. सुमारे २० लाखांपेक्षा अधिक खर्च या खांबाच्या उभारणीसाठी येणार असून, त्यावर नंतर सौरऊर्जेवर चालणारा सुमारे दीड लाख किमतीचा दिवा बसविला जाणार आहे.
या दीपस्तंभामुळे मच्छिमारांना पाण्यातील मार्गाबाबत मार्गदर्शन होणार असून, संभाव्य अपघात टळणार आहेत. त्याचप्रमाणे या सागरी दीपस्तंभामुळे मांडवी बंदराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. हा दीपस्तंभ सुरू झाल्यानंतर रात्रीच्या वेळी मांडवी जेटीवरील दृश्य हे विलोभनीयच असणार आहे. मात्र, सहा महिन्यांचे हे काम वर्ष झाले तरी अद्याप पूर्ण न झाल्याने त्यावर सौरऊर्जेवर चालणारा दिवा बसविणे दूरच राहिले आहे.
याबाबत माहिती घेतली असता संबंधित ठेकेदार हे काम पूर्ण करण्यासाठी वाळू व तत्सम बांधकाम साहित्य मिळत नसल्याचे कारण दाखवित मुदतवाढ घेत असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात अन्यत्र बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यासाठी वाळूही उपलब्ध होत असताना याच कामासाठी वाळू उपलब्ध होत नाही, असे कारण ठेकेदार देत असेल, तर जाणूनबुुजून हे काम पुढे ढकलण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. हे काम करण्यास ठेकेदार चालढकल करीत असेल तर त्याच्याकडील काम दुसऱ्या ठेकेदाराला द्यावे व लवकर हे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील किनाऱ्यालगतचा भाग जसा मच्छिमारीसाठी महत्त्वाचा ठरला आहे, त्याचप्रमाणे या भागात पर्यटनदृष्ट्या अनेक ठिकाणे विकसित केली जाऊ शकतात. मात्र, मांडवी बंदर व जेटीच्या विकासाकडे म्हणावे तसे लक्ष अद्याप दिले जात नसल्याचेच चित्र असून, त्यामुळे पर्यटन विकासात अडथळे येत आहेत. रत्नागिरी हे एक अत्यंत सुंदर व चांगली भौगोलिक रचना असलेले शहर आहे. भगवती किल्ला परिसर, मिरकरवाडा बंदर, पांढरा समुद्र ते राजीवडा व पुढील भागापर्यंत या शहराला चांगला किनारा लाभला आहे. भाट्ये खाडीलगतचा परिसरही विलोभनीय आहे.
या किनाऱ्यादरम्यान असलेले व रत्नागिरीचे ‘प्रवेशद्वार’ म्हणून प्रसिध्द असलेले मांडवी बंदर गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित आहे. येथे किरकोळ डागडुजी करण्यापलिकडे जेटी विकासाबाबत काहीही घडलेले नाही. या बंदराच्या परिसरात हॉटेल्स, खाद्यविक्रेत्यांचे जाळे असताना ज्या समुद्राच्या आकर्षणापोटी पर्यटक या ठिकाणी येतात, त्या बंदराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)
‘कपल्स’ची भाईगिरी
समुद्रात खोल पाण्याच्या बाजूने असलेली जेटी येथील सागराच्या तुफानी लाटांनी अधिकच कमकुवत झाली आहे. हा भाग जेटीच्या प्रवेशद्वारापासून खूपच लांब अंतरावर आहे. या भागाकडे किनाऱ्याकडून लक्ष जात नसल्याने सध्या तेथे प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. ओहोटीच्या वेळी तरुण-तरुणींची ‘कपल्स’ तेथे बसलेली दिसतात, तर नको ते प्रकारही तेथे घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी कारवाईची मागणी होत आहे.
बंदर जेटीची दुरुस्ती,
सुशोभिकरण आवश्यक
रत्नागिरीची बंदर जेटी जीर्ण झाली असून, अनेक ठिकाणी जमिनीकडून या जेटीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे या जेटीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. जेटीवरील कॉँक्रीट मार्गही जागोजागी फुटला आहे. तसेच जेटीवर असलेल्या पथदिव्यांचे खांब गंजून गेले असून, अनेक खांब मोडलेले आहेत. त्यावरील दिवे तर केव्हाच गायब झाले आहेत. आता यापैकी काही खांबाना ट्युबलाइट्स बांधून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, भरतीच्या वेळी त्यावर लाटांचे पाणी उडून या ट्यूबलाईट्स जाण्याचीच शक्यता अधिक आहे.