रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहातील जुना पडदा सरकता सरकेना
By Admin | Published: June 16, 2017 02:59 PM2017-06-16T14:59:40+5:302017-06-16T14:59:40+5:30
प्रयोगावेळी कर्मचाऱ्यांची कसरत
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी , दि. १७ : शहरातील वि. दा. सावरकर नाट्यगृहात ऐन नाटक सुरू असतानाच वर्षानुवर्षे जुना झालेला पडदा सरकता सरकेना अशी स्थिती झाल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. या घटनेने या नाट्यगृहाकडे नगरपरिषदेचे सतत दुर्लक्ष झाले असल्याचा प्रत्यय रविवारी नाट्यकर्मींना आला.
वि. दा. सावरकर नाट्यगृहात ‘अपराध मीच केला’ या व्यावसायिक नाटकाचा सायंकाळी ७ वाजता सुरू असलेल्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हा प्रकार घडला. मध्यंतरावेळी बराच वेळ झाला तरीही पडदा पडेना. कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनी हा पडदा पाडण्यात आला. मात्र, उघडतानाही तीच स्थिती. कर्मचारी चांगलेच मेटाकुटीस आले. साहजिकच या नाटकाच्या लोकप्रियतेमुळे या वातानुकुलित नाट्यगृहात महागडे तिकीट खरेदी करून आलेल्या नाट्यरसिकांच्या आनंदावर या व्यत्ययामुळे विरजण पडले. या नाटकातील काम करणाऱ्या कलाकारांचाही हिरमोड झाला.
हे नाट्यगृह वातानुकुलित करण्यात आले असले तरी यातील काही सोयीसुविधांचा अभाव सातत्याने जाणवतो. वातानुकुलित यंत्रणेतही सातत्याने बिघाड होत असतो. रंगमंचावरील स्पॉटही नादुरूस्त आहेत. त्यामुळे प्रयोगावेळी बाहेरून आणावे लागतात. मात्र, या सर्व गोष्टींकडे नगरपरिषदेचे वारंवार दुर्लक्ष होत आहे.
या नाट्यगृहाची गेल्या १० वर्षात योग्य देखभाल झालेली नसल्याचे अनेक नाट्यकर्मींकडून सांगण्यात आले. रत्नागिरी शहराचे आकर्षण असलेल्या या नाट्यगृहाची हेळसांड होत असल्याचे यावरून दिसून आले. नगरपरिषदेने हे जुने पडदे आता तरी बदलावेत, अशी मागणी रंगकर्मींकडून करण्यात येत आहे.