रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक ३ मधील समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:22 AM2021-07-21T04:22:09+5:302021-07-21T04:22:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्र. ३ मधील स्टेट बॅंक कॉलनी परिसराची दयनीय अवस्था झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्र. ३ मधील स्टेट बॅंक कॉलनी परिसराची दयनीय अवस्था झाली आहे. तातडीने या भागातील विविध समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी रत्नागिरी गटनेते समीर तिवरेकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी व शहराध्यक्ष सचिन करमरकर यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
प्रभाग क्रमांक ३ मधील स्टेट बँक कॉलनी परिसरातील नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. यामध्ये राजेश नेने, राजेंद्र घाग यांच्या घराजवळील गटारातील पाईप तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहात आहे. यामुळे रस्त्यात पाणी साचून ते रोगराईस कारणीभूत ठरत आहे. हेच पाणी प्रभागाच्या खालच्या भागातील घराजवळ तुंबून या ठिकाणी अनेकांच्या अंगणात जात आहे. गेले अनेक दिवस गटारातील पाणी वाहून नेणारा पाईप फुटलेला आहे, त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अनेक पादचारी, वाहनधारक यांनाही यापासून धोका निर्माण झाला आहे. तरी यावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याच भागातील वायंगणकर यांच्या घरासमोरील गटार पूर्णपणे मातीने भरलेले असल्याने राजेश नेने यांच्या येथून येणाऱ्या पाण्याच्या निचरा होत नसल्याने वायंगणकर यांच्या अंगणातही पाणी तुंबत आहे. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक त्रासले आहेत. या सर्व समस्यांकडे तत्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवीण देसाई यांनी केली. यावेळी प्रवीण देसाई यांच्यासमवेत भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, गटनेते समीर तिवरेकर, नगरसेवक तथा तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, नितीन गांगण, मंदार लेले आदी उपस्थित होते.