कुणी बाबा तर कुणी आईचे छत्र गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:54+5:302021-06-04T04:23:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर ठरली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लाटेत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर ठरली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लाटेत आतापर्यंत जवळपास २५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित झाले, तर साडेअकराशेपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. यात अनेकांनी आपले आप्त गमावले आहेत. काही ठिकाणी तर कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोनाचे बळी ठरले आहेत.
० ते १८ वयोगटातील ज्या मुलांचे आई आणि वडील दोन्हीही कोरोनामुळे गेले आहेत, अशांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्या मुलांचे वडील गेले आहेत आणि आई घरातच असेल अशा कुटुंबांची कमावती व्यक्तीच गेल्याने त्यांच्या मुलाबरोबरच कुटुंबावरही आर्थिक संकट कोसळणार आहे. त्याचबरोबर मुलांचे भवितव्य काय, हा प्रश्नही त्यांच्या मातेसमोर उभा राहणार आहे.
- दापोली तालुक्यातील म्हाळुंगे येथील ५४ वर्षीय पांडुरंग देवघरे आणि त्यांची पत्नी प्राची यांचे कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांची तीन मुले अनाथ झाली आहेत. या कुटुंबाचा पोशिंदाच गेल्याने त्याचबरोबर मातृछत्रही हरपल्याने या मुलांचे भवितव्य अंधारले आहे.
- मोठी मुलगी सिद्धी १९ वर्षांची असून, ती सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मात्र, तिच्या पाठची गाैरी आणि श्रीदीप ही जुळी भावंडे १५ वर्षांची असून, नववी इयत्तेत शिकत आहेत.
- पांडुरंग देवघरे हे व्यवसायाने कंत्राटदार होते. छोट्या-मोठ्या कामांवर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. परंतु त्यांच्या जाण्याने मुलांच्या शिक्षणाबरोबरच पुढे काय, हा प्रश्न उभा राहिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या ११६० व्यक्तींमधून ज्यांची मुले ० ते १८ वर्षांखालील आहेत. अशा बालकांना शोधून काढण्यासाठी चार दिवसांपासून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविल्यानंतर अशी ९० मुले सापडली आहेत. त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- समृद्धी वीर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, रत्नागिरी
एकरकमी पाच लाख
बालसंगोपन योजनेत बालकाला बालगृहामध्ये दाखल करून किंवा संबंधित बालकांच्या नातेवाइकाकडून संगोपन अशा दोन्ही पद्धतीत संबंधित बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. ठेवीची ही रक्कम बालकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार आहे.
शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार मिळणार
या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक (आई व वडील) मृत्यू पावलेले किंवा एका पालकाचा कोरोनामुळे व अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (१ मार्च २०२०) पूर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी ० ते १८ वयोगटातील बालकांचा बालसंगोपन योजनेत समावेश होणार आहे.