'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:41 PM2022-06-24T16:41:23+5:302022-06-24T16:41:38+5:30
सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
रत्नागिरी- मी अजूनही शिवसेनेतच असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सध्या ते रत्नागिरीतील पाली या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आहेत. मी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असतो, तर मी गुवाहाटीला गेलो असतो आणि तिथून तुमच्याशी बोललो असतो, असा टोला देखील त्यांनी पत्रकारांना लगावला. तसेच सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही, असं उदय सामंत म्हणाले. मला वाटतं की, जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. हे माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, असंही उदय सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट निर्माण केला, म्हणजे त्यांचे मत बदललं असं नाही, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, माझ्या कुटुंबीयांवर आणि मातोश्रीवर ज्यांनी घाणेरडे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. शिवसेनेची मूळं आजही माझ्यासोबत आहेत, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, अशी सुरुवात करत उद्धव ठाकरेंनी आता थेट मैदानात उतरुन बंडखोरांना इशारा दिला आहे. "महत्वाकांक्षा असावी पण अशी नसावी की ज्यानं दिलं त्यालाच खावं. तुम्हाला आमदार घेऊन जायचे आहेत घेऊन जा...आणखी कुणाला जायचं असेल त्यांनीही जा. जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आदित्यला बडवे म्हणायचं अन्...
आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का?, असा ,सवाल उपस्थित करत या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.