कुंभार्ली घाटातील ‘सोनापात्रा’ बनलाय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:38 AM2021-08-18T04:38:03+5:302021-08-18T04:38:03+5:30
चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील सोनापात्रा या ठिकाणी रस्ताच खचल्यामुळे येथे वारंवार अपघात ...
चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील सोनापात्रा या ठिकाणी रस्ताच खचल्यामुळे येथे वारंवार अपघात होऊन वाहतूक ठप्प होत आहे. याबाबत अलोरे शिरगाव पोलीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला असला, तरी संबंधित खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत.
कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाट हा नागमोडी वळणाचा आहे. १८ किलोमीटर अंतराच्या घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वात मोठा खड्डा सोनापात्रा याठिकाणी पडला आहे. पोफळीपासून घाट सुरू होतो आणि सोनापात्रा येथील एका अवघड वळणावर आल्यावर अर्धा घाट पूर्ण होतो. मात्र त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ४० ते ५० टनाची अवजड वाहने या ठिकाणी अडकतात. काही वेळा वाहने जागेवर उलटून होऊन अपघात होतो. सततच्या घटनांमुळे अनेकदा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन घाट बंद होतो.
गणपती सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यातील आंबा घाट, कशेडी घाटात काही समस्या असेल तर कुंभार्ली घाटमार्गे वाहतूक करण्यात येते. मात्र सद्यस्थितीत कुंभार्ली घाटही बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.